समताच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी बनविले विविध उपकरणे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिर्डी येथील सिल्व्हर ओक अकॅडमी अंतर्गत श्री चैतन्य टेक्नो स्कूल आयोजित विज्ञान प्रदर्शनात चमकदार कामगिरी केली आहे. त्यात ‘शेतीसाठी तंत्रज्ञान’ या विषयावर ‘वायरलेस टेस्टर’ उपकरण कुणाल पवार यांनी बनविले, तर ‘शॉर्ट सर्किट संरक्षक’ उपकरण आयशा सय्यद, हासिम अलीशाद यांनी तयार करून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारा आधुनिक शेती करण्यासाठी उपकरणे उपलब्ध करून दिली आहे.

     तसेच ‘रोबोटिक्स’ या विषयावर ‘ह्युमनॉइड रोबोट’ पहेल लोकचंदाणी, द्रिष्टी लोकचंदाणी, इप्सिता रॉय यांनी बनवत प्रथम क्रमांक, ‘सेल्फ ड्रायव्हिंग रोबोट’ ॲना वेस्ले, हिमांशु गोंदकर, क्रिष्णा गोंदकर यांनी बनवत द्वितीय क्रमांक तर निभिष सरवार, कलश बागरेचा व केशमा खुराणा यांनी ‘रोबोटिक सेन्सॉर कार’ बनवत तृतीय क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थ्यांना कम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख उदय पाटील, शिक्षक आदित्य काकड यांचे मार्गदर्शन मिळाले तर इतर शिक्षक व कर्मचारी यांचे ही सहकार्य लाभले.

    प्रथम क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांना सुवर्ण पदक, सन्मान चिन्ह सहभाग प्रमाणपत्र व इतर बक्षिसे द्वितीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना कांस्य पदक, सन्मान चिन्ह सहभाग प्रमाणपत्र व इतर बक्षिसे  तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व इतर बक्षिसे श्री चैतन्य टेक्नो स्कूलचे कार्यकारी अधिकारी गणेश गुप्ता, सिल्व्हर ओक स्कूल प्राचार्या मोहिनी जगताप व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

    दोन गटात भरविण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी स्पर्धकांना अ गटासाठी कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, प्रदूषण नियंत्रण उपाय तर ब गटासाठी पर्यायी ऊर्जा संसाधने, शेतीसाठी तंत्रज्ञान, रोबोटिक्स असे विषय देण्यात आले होते. अहमदनगर जिल्ह्यातील सीबीएसई पुरस्कृत शाळांमधील ५३० स्पर्धकांनी प्रदर्शनात सहभाग नोंदविला होता.

    समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे, कार्यवाहक संदीप कोयटे प्राचार्या हर्षलता शर्मा, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, तालुक्यातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.

समता इंटरनॅशनल स्कूल हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. तसेच विज्ञानात होत असलेले विविध बदल आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची शेती आधुनिक पद्धतीने कशी करता येईल. या बाबतचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.