कोपगावकरांना शुद्ध पाणी न पुरविल्यास उपोषणाचा ईशारा – विवेक कोल्हे

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.४ : कोपरगाव शहरवासियांना गढूळ गाळमिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी मिळते, त्या पाण्यातून रोगराई वाढून मुले मुली, ज्येष्ठ नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तेव्हा २६ जानेवारीच्या अगोदर जर सुधारणा न झाल्यास पालीका प्रशासनाच्या विरोधात जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

           कोपरगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्या संदर्भात व प्रलंबित असणाऱ्या नागरी सुविधांबाबत जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या दालनात मंगळवारी आढावा बैठक घेऊन त्यात हा इशारा दिला. शहरवासीयांच्या अनेक समस्यांचा पाढा वाचुन विवेक कोल्हे यांनी मुख्याधिकारी गोसावी यांना धारेवर धरत पालीका प्रशासनाला निरूत्तर केले.

           फिल्टर प्लांटच्या ठेकेदारावर कुणाची मेहेर नजर आहे, लाखो रुपयांची उधळपट्टी त्यातून सुरू आहे, शहरवासीयांना शुद्ध पाण्याऐवजी गाळ मिश्रित अशुद्ध पाणी पुरवले जाते.  जोपर्यंत शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराची बिले अदा करू नये असेही विवेक कोल्हे यावेळी बोलताना म्हणाले. प्रारंभी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

            गोरगरीब शहरवासीय त्यांचे प्रलंबित प्रश्न पालिका कार्यालयात घेऊन येतात मात्र मुख्याधिकारी कधीच त्यांच्या दालनात उपस्थित नसतात ते संध्याकाळी सहा नंतर कार्यालयात येतात अशा असंख्य तक्रारी नागरिकांनी यावेळी केल्या त्यावर त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला. शहरात सध्या रस्त्यांसह अन्य विकास कामे होत आहे मात्र त्याचा दर्जा बेसुमार आहे. नागरिकांचे पैशाची उधळपट्टी सुरू आहे, प्रशासक मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे त्यांच्या कर्तव्यात कसूर करत आहेत, जनतेला वेठीस धरून त्रास देण्याचे धोरण सध्या सुरू आहे, त्याला कुणाचा राजकीय वरदहस्त आहे काय?

           रस्त्याच्या खड्डेदुरुस्ती ठेक्यात काढल्या जाणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलांबाबतीत गंभीर भूमिका घेण्याची मागणी केली.  या समस्या व मागण्यावर जर येत्या २६ जानेवारीच्या आत कार्यवाही करून सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  देत कोल्हे पुढे म्हणाले गोरगरीब छोट्या व्यवसायीकांना रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना पालीका अतिक्रमणाच्या नावाखाली उठवते मग धनदांडगे शासकीय जागेवर अतिक्रमण करुन तिन तिन मजली इमारती बांधतात त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही.

निकृष्ट दर्जाचे कामे केले जातात यावर अधिकारी गप्प का आहेत. नागरीकांच्या समस्या सोडवण्यात पालीका प्रशासन  कमी पडत आहे. नगरसेवकांच्या तक्रारीला केराची टोपली दिली जाते याबद्दल कोल्हे यांनी खंत व्यक्त केली.  दरम्यान आढावा बैठकीत कोल्हे यांच्या समवेत विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मनसेचे संतोष गंगवाल यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभिर आरोप केले. एक अधिकारी फक्त दर शनिवारी कोपरगाव शहरात येवुन एका चहाच्या हाॅटेलमध्ये बसतो. अधिकारी येताच पालीकेचे ठेकेदार तिथे एकवटून आर्थीक देवाण घेवाण करतात असा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली. उपस्थित नागरीकांनी पालीकेच्या कामकाजावर विविध आरोपातुन नाराजी व्यक्त केली. 

शहराच्या विविध भागातील रहिवासी नागरिकांनी नळाला येणाऱ्या अशुद्ध पाण्याचा आहेर मुख्याधिकाऱ्यांना देत हे पाणी पिऊन दाखवण्याची गळ असंख्य नागरिकांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना घातली. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा धाक आणि प्रश्न सोडवण्याची हातोटी असंख्य नागरिकांनी यावेळी बोलून दाखवली.