दर्जेदार काम न केल्यास ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येईल- आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : जाणीवपुर्वक काम रेंगाळण्याचा प्रयत्न होत असेल तर त्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे. दर्जेदार काम करत नसलेल्या ठेकेदार एजन्सीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात येईल, आम्ही कुणाचीही पाठराखण करणार नाही. अशी तंबी आमदार  मोनिकाताई राजळे यांनी दिली.

दहिफळ जुने ते एरंडगाव ते खानापुर, आव्हाणे अमरापुर, खुंटेफळ ते दारकुंडे वस्ती, बोडखे ते ताजनापुर या ८ कोटी २० लाख रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ आज सोमवारी (दि.३१ )  आ . राजळे यांच्या हस्ते झाला, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जेष्ठ नेते बापुसाहेब भोसले, तालुकाध्यक्ष ताराभाऊ लोढे, आशा गरड, बापु पाटेकर, उमेश भालसिंग, कचरू चोथे, शिवाजी भिसे, बाळासाहेब कोळगे, संदिप वाणी, बाळासाहेब आव्हाड, रामनाथ काकडे, शशिकांत खरात, संतोष डूरे, गणेश गोर्डे, रामदास कोळगे, विष्णु गरड, उत्तम दिंडे, अनिल खैरे, रामदास दिवटे, पोपट वाघमोडे, ताराचंद दिवटे, किसन वाणी आदि उपस्थित होते.

    राजळे म्हणाल्या, दोन्ही तालुक्यातील अनेक रस्ते प्लॅनिंगमध्ये घेतले जाणार आहेत. गेल्या पंचवार्षीक मध्ये जेवढा निधी मिळाला नाही तेवढा १५० कोटीचा निधी या एका वर्षात मिळाला आहे. सौभाग्य योजनेतंर्गत अक्षय प्रकाशची १३.५० कोटींची कामे केली पंरतु महाविकास शासनाने ती योजना बंद केली. माझी वसुधंरा योजनेच्या स्पर्धेत अनेक गांवानी उतरले पाहिजे असे सांगुन त्या म्हणाल्या येणारे वर्ष निवडणुकीचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जबाबदारीने योगदान द्यावे.

       अतिवृष्टी नंतर आता सततच्या पावसाच्या नुकसान भरपाईचा निर्णय झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य केले. असे चांगले लोक आपल्यात आल्याने हे शासन गतिमान झाले आहे. २०२४ मध्ये मोदींना पंतप्रधान करायचे आहे. केंद्रात सरकार आले कि त्याचा राज्यात परिणाम होतो. नेता टिकला तरच विकास कामे होतात. सत्ते अभावी दोन अडीच वर्ष किती हाल झाले याचा सर्वांनी अनुभव घेतला म्हणुन पक्ष व संघटनेसाठी वेळ द्यावा असे आवाहन आ. राजळे यांनी  केले.