शेवेगाव परिसरात चोरांचा सुळसुळाट, एकाही चोरीचा तपास न लागल्याचे नागरिकांमध्ये नाराजी

शेवगाव प्रतिनिधी, दि. १/९/२३ : शेवगाव परिसरात सध्या चोराचा सुळसुळाट झाला आहे. २३ जूनला शेवगावात मारवाडी गल्लीत दोघांचा खून करून चोरट्याने लाखोचा ऐवज घेऊन पोबारा केला या घटनेला अडीच महिने झाले. तरीही तपासात काही ठोस प्रगती नसल्याने चोरट्यांची उमेद वाढल्याचे चित्र आहे.

     परिसरात झालेल्या चोर्‍यावरून चोरट्यांना आता काहीही वर्ज्य राहिले नाही. पैसे दागदागिने याशिवाय गेल्या आठदहा दिवसात डीजे च्या सामानाची, देवस्थानातील दानपेट्या, देवांच्या अंगावरील सोन्याचांदीची आभुषणे, देवस्थानातील चांदी सह तांब्या पितळाचे किंमती साहित्य चोरीला गेले आहे. तर शेवगावातील एकाची  नुकतीच व्यालेली गाय व शेतातील विहिरी वर बसविलेल्या सौर उर्जेची मोटार तसेच सौर उर्जेच्या   प्लेटा देखील चोरट्यांनी सोडल्या नाहीत.

  शनिदेवाची साडेसाती लागू नये म्हणून  सर्व जण भिवून असतांना येथे मात्र चोरट्याचीच साडेसाती शनिदेवा मागे लागली आहे. पंचक्रोशीतील ताजनापूर रस्त्यावरील शनिदेवस्थानातील दानपेटी तसेच देवाधिदेव महादेवाच्या वृध्देश्वर मंदिरातील दानपेटीही चोरट्यानी चोरून फोडली आहे. तर १८ आगष्टला एकाच दिवशी पहाटेच्या वेळी भगूर जवळील पेट्रोल पंपावर ठेवलेले डीजेचे किंमती साहित्य रात्रीच्या सुमारास चोरीला गेले.

तर दीड वाजता श्रीक्षेत्र अमरापूरच्या  श्री रेणुका माता देवस्थानातून मातेच्या अंगावरील सोन्या चांदीची आभुषणे व छत्री, टोप, मासोळ्या, समया, तांब्या पुलपात्रे, राजदंड असे चांदीचे साहित्य मिळून तब्बल १७ लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. त्यानंतर लगेच लोहसरच्या देवस्थानात चोरी झाली आहे.

तर  २५ आगष्टला शेवगावात सुनंदा खापरे यांची नुकतीच व्यालेली गावरान गाय रात्री साडेदहा वाजता आखेगाव रोडवरील त्यांच्या राहत्या    घरासमोरील पटांगणातून चोरीला गेली आहे. विशेष म्हणजे यां गाईचे वासरू चोरटे तिथेच सोडुन गेले. तर २७ ऑगष्टला श्री क्षेत्र अमरापूर शिवारात  पहाटेच्या सुमारास भरत मोटकर यांच्या  शेतातून  सौर उर्जेच्या प्लेटा चोरीला गेल्या.  चोरट्यांनी जातांना शेतातील काही क्षेत्रातील कपाशी उपटून  मोठे नुकसान केले.

तर याच वेळी श्री रेणुका माता देवस्थानचे मागील बाजूस काही अंतरावर दीपक शंकर क्षिरसागर यांच्या शेतातील विहिरीवरील सौर उर्जेची पाच आश्व शक्तीची मोटार व स्टार्टर चोरीला गेला आहे. येथील सौर उर्जेच्या काही प्लेटाची व पाईप लाईनची मोडतोड झाली आहे.

विशेष म्हणजे शेवगावातील मारवाडी गल्ली तील दुहेरी खून व चोरी प्रकरणातील आरोपी अनेक सीसी टीव्ही मधील फुटेज मध्ये सापडला आहे. त्यावरुन पोलिसांनी एकाला लगेच ताब्यातही घेतले. मात्र पोलिस यत्रणेने अद्याप त्याचाबत अधिकृतपणे काही माहिती दिली नाही. त्यामुळे सामान्यांची साशंकता वाढली आहे. 

तसेच वृद्धेश्वर व ‘श्री रेणुका माता देवस्थानात असलेल्या अत्याधुनिक सीसी टीव्ही फुटेज मध्ये चोरटे स्पष्ट कैद असतांना देखील येथील चोर्‍यांचा अद्यापी तपास लागलेला नाही, पोलिस प्रशासनाने या चोऱ्यांचा तपास जलद गतीने लावून सर्वांना आश्वासित करावे अशी नागरिकांची मागणी आहे.