माजी आमदार कोल्हेंचा शहर विकासाला अडथळा – संदीप वर्पे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : यापूर्वीही माजी आमदारांनी २८ विकासकामांना विरोध करून कोपरगाव शहरातील नागरिकांना दोन वर्ष विकासापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे त्या काळात कोपरगावच्या जनतेने काय भोगलंय हे जनता अजून विसरलेली नाही. व आता पुन्हा एकदा विकास कामांना आडवे जाण्यासाठी तुम्ही करीत असलेल्या खटाटोपामुळे पुन्हा कोपरगावची जनता विकासापासून दूर जाणार आहे. त्यामुळे आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराचा आर्थिक स्वार्ध साधण्यासाठी माजी आमदार शहर विकासाला अडथळा निर्माण करीत असल्याची टीका राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्यावर केली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेणे शहर विकासाच्या दृष्टीने आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार हाती घेतलेल्या कोपरगाव शहरातील नियोजित कामात माजी आमदार कोल्हे यांच्या दबावाला न जुमानता  या कामात बदल करून करू नये यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. 

संदीप वर्पे पुढे असे म्हणाले  की, जिल्हा नियोजन विभाग अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान, नागरी दलीतेत्तर योजना. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती आदी योजनांच्या माध्यमातून कोपरगाव नगरपरिषदेणे शहर विकासाच्या दृष्टीने आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार शहरातील त्या-त्या प्रभागातील नागरिकांना अपेक्षित असलेली विकासकामे हाती घेतली आहेत.

यामध्ये शिंदे-शिंगी नगर येथील पूल, खंदकनाला पूल, टिळकनगर-तहसील कार्यालय रस्ता, बँक रोड रस्ता, शंकर नगर पूल, वैशाली स्कूटर ते अमरधाम रस्ता, हद्द वाढीतील देवकर प्लॉट रस्ता,गोदावरी पेट्रोल पंप कृषी उत्पन्न बाजार समिती रस्ता, बैल बाजार रस्ता पूल, ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा रस्ता अशी विविध विकासकामे सुचविण्यात आली आहेत. त्या कामांच्या तांत्रिक मान्यतादेखील झालेल्या आहेत.

परंतु माजी आमदारांनी सत्ताधाऱ्यांचा दबाव टाकून मर्जीतल्या ठेकेदाराचे हित साधण्यासाठी या विकासकामात बदल करण्याचा घाट घातला आहे हे चुकीचे आहे. त्यामुळे प्रशासनाने हा दबाव झुगारून विकासकामात राजकारण न करता सर्व भागाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी.  

राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही विकासाला विरोध न करता नेहमीच कोपरगाव शहर विकासाला प्राधान्य दिले आहे हे कोपरगावच्या जनतेला माहित आहे. त्यामुळे शहर विकास डोळ्यासमोर ठेवून विकास कामे होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहर विकासाच्या कामात बदल करून माजी आमदारांनी शहर विकासाला आडवे येवू नये. कुणाचाही दबाव मुख्याधिकाऱ्यांवर आणून नियोजित कामात बदल न करता नियोजित कामेच होण्यासाठी सहकार्य करावे असे संदीप वर्पे यांनी शेवटी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, रमेश गवळी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, डॉ. तुषार गलांडे, राहुल देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के, अशोक आव्हाटे, वाल्मिक लहिरे, विकास बेंद्रे, इम्तियाज अत्तार, राजेंद्र आभाळे, मनोज नरोडे, ठकाजी लासुरे, डॉ. राजेंद्र रोकडे, शंकर घोडेराव, कैलास मंजुळ, किशोर डोखे, शैलेश साबळे, महेश उदावंत, सागर लकारे, चांदभाई पठाण आदी उपस्थित होते.