कोपरगाव नगरपरिषदेच्या नवीन इमारतीसमोरील माधव उद्यानात स्व. माधवराव आढाव यांचा पूर्णाकृती पुतळा उभारा – लक्ष्मी-माधव प्रतिष्ठान

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १/९/२३ : कोपरगाव नगरपरिषदेच्या नवीन इमारतीसमोर असलेल्या माधव उद्यानाचे नाव बदलू नये. तसेच या उद्यानात माजी नगराध्यक्ष स्व. माधवराव आढाव यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी लक्ष्मी-माधव प्रतिष्ठानने नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात लक्ष्मी-माधव प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी (३१ ऑगस्ट) नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माधवराव आढाव सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगर परिषदेतील भाजपचे माजी गटनेते रवींद्र पाठक, बाळासाहेब नरोडे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक बाळासाहेब आढाव, रवींद्र आढाव, प्रसाद आढाव, वैभव आढाव, रवींद्र रोहमारे, दिनेश कांबळे, राजेंद्र बागुल, दत्ता कोळपकर, विकास आढाव, मंदार आढाव, बंडू आढाव, प्रमोद नरोडे, विक्रम आढाव, सुशांत खैरे, दीपक जपे, किरण सुपेकर, राजेंद्र पाटणकर, खालिकभाई कुरेशी, फकीर मोहम्मद पैलवान, सतीश रानोडे, अनिल जाधव, विष्णुपंत गायकवाड,गौरव आढाव आदी उपस्थित होते. 

नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी नगराध्यक्ष स्व. माधवराव आढाव यांनी देशासह कोपरगाव शहरासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. सन १९४७ मध्ये कोपरगाव नगरपरिषदेची स्थापना झाली. स्व. माधवराव (अप्पा) आढाव यांनी नगर परिषदेचे अध्यक्षपद भूषविताना कोपरगाव शहरातील विविध प्रश्न मार्गी लावून शहर विकासात मोलाचे योगदान दिलेले आहे.

स्व. माधवराव (अप्पा) आढाव यांनी त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात महापुरुषांचे पुतळे व महापुरुषांच्या नावाने उद्याने उभारून कोपरगाव शहरात बंधुभाव व सामाजिक एकोपा टिकविण्यासाठी मोलाचे कार्य केलेले आहे ते विसरता येण्यासारखे नाही. त्यावेळी त्यांनी उभारलेल्या महापुरुषांचे पुतळे व उद्यानांच्या कोनशिला आजही त्यांच्या कामाची साक्ष देत आहेत. स्व. माधवराव आढाव यांनी महापुरुषांच्या विचारांना अनुसरून कोपरगाव शहरासाठी उत्तुंग असे कार्य केलेले आहे.

स्वातंत्र्यसेनानी व माजी नगराध्यक्ष स्व. माधवराव आढाव यांच्या नावाने असलेल्या माधव उद्यानात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून उद्यानाच्या नावात बदल न करता संपूर्ण जागेचे सुशोभीकरण करून कोपरगाव शहराचा नावलौकिकात भर घालावी, अशी मागणी कोपरगावकरांनी केलेली होती. त्यानुसार सिटी सर्व्हे नंबर २०४० मध्ये बागेचे आरक्षण होते तेथेच माधव उद्यान तयार झाले. त्यामध्ये विविध प्रकारची फुलझाडे, मोठमोठे वृक्ष व बालगोपालांना खेळण्यासाठी साहित्य तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे होते.

१९६५ साली तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन झाले. त्या घटनेस यंदा ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत. माधव उद्यान विकसीत व्हावे व स्व. माधवराव आढाव यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा म्हणून सन २००९ मध्ये आढाव परिवारातील सदस्यांनी आंदोलनदेखील केलेले आहे.

माजी आमदार स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव नगर परिषदेच्या नवीन इमारतीस मंजुरी मिळालेली असून, सिटी सर्व्हे नंबर २०४१ मध्ये उभारण्यात येत असलेल्या नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. या नव्याने होणाऱ्या इमारतीसमोरच ‘माधव उद्यान’ आहे. या उद्यानाच्या नावात कसलाही बदल न करता पूर्वीचेच ‘माधव उद्यान’ हे नाव कायम ठेवावे आणि नगरपरिषदेची नवीन इमारत वापरासाठी खुली होण्यापूर्वी या उद्यानात माजी नगराध्यक्ष स्व. माधवराव आढाव यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

लक्ष्मी-माधव प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी हे निवेदन देण्यासाठी पदाधिकारी नगरपरिषद कार्यालयात गेले असता, नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे नेहमीप्रमाणे कार्यालयात हजर नव्हते. याबद्दल विजय आढाव व अन्य पदाधिकाऱ्यांनी गोसावी यांचा तीव्र निषेध केला. गोसावी हे शहरातील नागरिकांच्या समस्या व विकासाचे प्रश्न सोडविण्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. नागरिकांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवतात, असे सांगत विजय आढाव व इतर पदाधिकाऱ्यांनी गोसावी यांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.