शेवगाव तालुक्यातील विविध गावात कॅन्डल मोर्चा

शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनाचे पडसाद शेवगावसह तालुक्याच्या ग्रामीण परिसरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात उमटत आहेत. शेवगावसह तालुक्यातील भातकुडगाव फाटा, गदेवाडी, चापडगाव, अमरापूर, आखेगाव, मळेगाव, ढोरजळगाव, खामपिंपरी, वरुर आदि गावात लाक्षणिक उपोषण कॅन्डल मोर्चा अशा विविध आंदोलनानी परिसरातील वातावरण ढवळून निघाले आहे. शेवगाव आगाराची बस वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने ऐन दिवाळी सणाच्या कालावधीत शेवगाव बाजारपेठेची उलाढाल कमालीची मंदावली असून पेठेत सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे.

आज येथील क्रांती चौकातील साखळी उपोषण आंदोलनास भाजपा प्रदेश चिटणीस अरुण मुंढे, मेडिकल असोशिएशनच्या डॉ. गणेश चेके, डॉ. विक्रम घनवट, डॉ. विकास बेडके, डॉ. दादा काकडे, डॉ. विजय झरेकर, डॉ. अजित गवळी यांचे सह समस्त धनगर समाज, चर्मकार समाज, संघटनेचे पदाधिकारी तसेच माजी सभापती डॉ. क्षितीज घुले, बाजार समिती उपसभापती गणेश खंबरे, संचालक हनुमान पातकळ, प्रदीप काळे आदिंनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनास जाहीर पाठींबा दिला.