के.जे.सोमैया महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महान भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रमण यांनी केलेल्या रामन प्रभावाचा शोध साजरा करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणुन साजरा केला जातो.

महाविद्यालयांमध्ये विज्ञान दिवस साजरा करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे प्रेरित करणे आणि सर्वसामान्यांना वैज्ञानिकांच्या कामगिरीची जाणीव करून देणे हा आहे. या दिवसाचे औचित्य साधुन विज्ञान मंडळाचे उद्घाटन व विज्ञान विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी विज्ञान मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले की, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे व भारताने आपल्या ज्ञानाच्या जोरावर विश्वात आपले नाव कोरलेले असुन गेल्या काही वर्षांपासून भारताने विज्ञान क्षेत्रात केलेली प्रगती नेत्रदिपक ठरत आहे.

डॉ.सी.व्ही.रमण यांच्या सारख्या भारतीय शास्त्रज्ञानी दिलेले योगदान आपण कधीही विसरू शकत नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी विज्ञान शाखाप्रमुख प्रो.बी.बी.भोसले यांनी डॉ.सी.व्ही.रमण यांची विज्ञान क्षेत्रातील कामगिरी अधोरेखित करतांनाच विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेचे ज्ञान मिळवून आपले व महाविद्यालयाचे नाव रोशन करावे असे सांगितले. या दिवसाचे औचित्य साधून रसायनशास्त्र विभागाचे डॉ.एस.जी.कोंडा यांचे राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन संपन्न झाले.

त्यांनी आपल्या मार्गदर्शनात डॉ.सी.व्ही.रमण यांचे जीवनचरित्र विशद करतानांच त्यांचा उत्कृष्ट शोध रमण इफेक्टबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमांच्या प्रास्ताविकात विज्ञान मंडळाचे प्रमुख डॉ.आर.डी.गवळी यांनी दरवर्षी विज्ञान मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सदाशिव नागरे यांनी तर आभार डॉ.बी.एस.गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेतील प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.