मराठी साहित्याचे वाचन आणि चिंतन गरजेचे – प्रा.संदीप जगताप

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : जेव्हा जात आणि धर्म टोकदार होतात तेव्हा तुमच्या जगण्याचे प्रश्न बोथट होतात. आजचे सामाजिक वातावरण अत्यंत विषम आणि बिघडलेले आहे. अशा प्रदूषित वातावरणात जातीपातीचे विचार बदलून सामाजिक समभाव टिकवण्यासाठी मराठी साहित्याचे वाचन आणि चिंतन अधिक गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध युवा कवी प्रा. संदीप जगताप यांनी येथे केले.

स्थानिक के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित राजभाषा मराठी गौरव दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे विकास समितीचे सदस्य मा. सुधीर डागा होते. प्रा. जगताप पुढे म्हणाले की, बालपणी माझी आई विहीरीवरुन पाणी आणतांना म्हणायची की डोक्यावरचा हंडा कधीच रिकामा नको, अन्यथा तो डचमळतो. त्याचप्रमाणे आपले डोके ही ज्ञानाने परिपूर्ण भरलेले असावे, नसेल तर जीवन जगण्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. 

केवळ कार्यक्रमांनी मराठीचे संवर्धन होणार नाही तर त्यासाठी आपली ठोस कृती महत्त्वाची आहे. मराठी माणूस संवेदनशील आहे, तो सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेतो. आपले संस्कार आणि शिक्षण हे आपल्या वर्तनातून दिसले पाहिजेत अन्यथा ते कुचकामी ठरते. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम एका विद्यापीठाच्या कुलगुरूंची मुलाखत घेताना ते प्रत्येक उमेदवाराला एकच प्रश्न विचारत होते की, तुमचे आई-वडील कुठे राहतात?  निवड  समितीतील सदस्यांनी कलामांना याविषयी विचारल्यानंतर कलाम म्हणाले होते, की ज्यांना आपले आई-वडील सांभाळता येत नाहीत, ते विद्यापीठ कसे काय सांभाळतील ? म्हणून माझे सर्व विद्यार्थ्यांना सांगणे आहे की आपले संस्कार आणि ज्ञान हे आपल्या कृतीतून दिसले पाहिजे. मी स्वतः शेती करून आई-वडील सांभाळून कविता लिहिणारा कवी व शिक्षक ही आहे. 


कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा सुधीर डागा म्हणाले की, सर्व विषय आणि सर्व भाषा महाराष्ट्रात एकत्र नांदतात मराठी आपल्याली मातृभाषा म्हणून उत्तम बोलता आलीच पाहिजे. केवळ कार्यक्रमाने मराठीचे संवर्धन होणार नाही, तर आपली ठोस कृती महत्त्वाची आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव आपल्या मनोगतात म्हणाले की, मातृभाषा म्हणून आपल्याला मराठी उत्तम बोलता आलीच पाहिजे परंतु आजच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी च्या युगात राष्ट्रभाषा म्हणून हिंदी आणि आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजीचे ज्ञानदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. 


याप्रसंगी 14 ते 28 जानेवारी या काळात संपन्न झालेल्या मराठी पंधरवड्यातील वक्तृत्व काव्यवाचन पोस्टर ग्रंथ रसग्रहण आदी स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकाच्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये समाधान वावळ, आरती मोरे तेजस्वी सोनवणे, साक्षी पैठणकर, मेघा सोनवणे, कल्याणी लिंभुरे, वर्षाली होन, संपदा आभाळे, वैष्णवी होन, कृष्णा दरगुडे, मानसी उपाध्याय, अश्विनी कांबळे, निकिता कोतकर, स्नेहल कोतकर यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मराठी विभाग प्रमुख डॉ. गणेश देशमुख यांनी मराठी विभागाच्या वतीने संपन्न झालेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती देतानाच मराठी भाषा आणि संस्कृतीचा संक्षिप्त आढावा घेतला व महत्त्व विशद केले. 
पारितोषिकांची घोषणा डॉ. जिभाऊ मोरे यांनी केली तर प्रा. संपत आहेर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शैलेंद्र बनसोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. एन. एम. वैद्य, डॉ. संजय दवंगे, डॉ. एम. बी. खोसे, प्रा. किरण सोळसे, प्रा. एस. पी. वैद्य, श्री संजय वेताळ होते.