दिवाळीच्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी मिळणार – पुष्पा काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०३ : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू माफक दरात एकाच जागेवर खरेदी करता याव्यात यासाठी मागील वर्षापासून सुरु करण्यात आलेला दिवाळी हाट खरेदी उत्सव रविवार (दि.०५) पासून सुरु होणार असल्याची माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे यांनी दिली आहे.

दिवाळी सणाला खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू माफक दरात एकाच ठिकाणी मिळाव्यात तसेच कोपरगाव शहर व तालुक्यातील बचत गट व गृहोद्योग चालविण्याऱ्या अनेक छोट्या व्यावसायिकांना आपली उच्च दर्जाची उत्कृष्ट उत्पादने विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे. या दुहेरी उद्देशातून माजी आमदार अशोक काळे व आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पा काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी कृष्णाई मंगल कार्यालयात मागील वर्षपासून दिवाळी हाट हा खरेदी उत्सव सुरु केला आहे.

मागील वर्षी प्रथमच वर्ष असतांना देखील ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे दोन दिवस असलेला हा खरेदी उत्सव एक दिवस जास्त ठेवण्यात आला होता. याहीवर्षी दिवाळी हाट हा खरेदी उत्सव रविवार पासून सुरु होणार असून नागरिकांना रविवार व सोमवार दिवाळी सणाची खरेदी करण्यासाठी सुवर्ण संधी या निमित्ताने मिळणार आहे.

दिवाळी सणाच्या निमित्ताने खरेदीच्या माध्यमातून होणाऱ्या मोठ्या आर्थिक उलाढालीचा महिला बचत गटांना देखील लाभ होणार आहे. स्थानिक महिला बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी दिवाळी हाट हि सुवर्णसंधी असून या संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे यांनी केले आहे.