स्कूल बसच्या धडकेत बहिणीचा मृत्यू , तर भाऊ गंभीर जखमी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१: तालुक्यातील पढेगाव शिवारात शाळेत जाणाऱ्या बहिण भावाला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कूल बसने जोराची धडक दिली. त्यात कोमल नारायण पगारे (१३) ही उपचारापुर्वीच मयत झाली, तर ऋतीक नारायण पगारे (११) हा गंभीर जखमी झाला आहे. सदरच्या दुर्दैवी घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील ४५ चारी पढेगाव येथील कोमल नारायण पगारे व रुतिक नारायण पगारे हे दोघे ३१ जुलै २०२३ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पढेगाव शिवारातील वैजापूर रोडने सायकलने शाळेत जात असताना न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वारा समोर शिरसगाव येथील श्री गुरूदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल बस क्रमांक एम एच १७ बी डी १८०१या बसने समोरून जोराची धडक दिली.

या धडकेत कोमल व ऋतीक गंभीर जखमी झाले होते. कोमल व ऋतीक यांना तात्काळ कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यात कोमल ही उपचारापुर्वीच मयत झाली तर रुतिक याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. कोमलचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पगारे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळा आहे.

या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी रुग्णालयात व घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून सदर बस व बसचालक योगेश भाऊसाहेब खिलारी याला ताब्यात घेतले आहे. सदर बस चालक हा घटनास्थळावरून अपघात झाल्यावर फरार झाला होता. या प्रकरणी नारायण नाना पगारे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात बस चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.