कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : जर मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण हवं असेल तर मराठा समाजाने दहा वर्षे लंगोट वापरावी असे वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केले होते. त्या वक्तव्याचा निषेध म्हणुन कोपरगावच्या सकल मराठा बांधवांच्या वतीने लंगोट परिधान करुन शेंडगे यांचा निषेध करण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज कोपरगावच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर गेल्या आठ दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे. नुकतंच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावरून बेताल वक्तव्य केले होते. त्यांचा निषेध म्हणून कोपरगाव येथील मराठा आंदोलक विनय भगत यांनी चक्क लंगोट परिधान करुन प्रकाश शेंडगे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
तसेच शेंडगे यांचा शेलक्या शब्दात निषेध केला. यावेळी त्यांच्या समवेत अशोक आव्हाटे, अनिल गायकवाड, विकास आढाव, दिपक वाजे, बालाजी गोर्डे रविंद्र कतले, रूपेश सिनगर, लक्ष्मण सताळे, साईनाथ नरोडे, सुनिल साळूंके,अजित कोताडे आदी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते
यावेळी बोलताना अशोक आव्हाटे म्हणाले, स्वतःला ओबीसींचे नेते म्हणवणारे प्रकाश शेंडगे यांनी मराठा समाजाला दहा वर्षे लंगोट घाला मग आरक्षण देतो असं बोलणारे व आम्हाला आरक्षण देणारे हे शेंडगे कोण आहेत. आम्ही आरक्षण मागतोय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेच्या अधिकायानुसार मागतोय.
जर आम्हाला ओबीसी आरक्षण देण्यासाठी शेंडगे लंगोट घालायला लावत असतील तर मग त्यांना एसटी आरक्षण हवे असेल तर मग ते कंबरेला झाडपाला बांधुन फिरणार काय? शेंडगे यांनी दोन समाजात तेढ निर्माण करु नये. शासनाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे म्हणत अशोक आव्हाटे यांनी शेंडगे यांचा निषेध केला. लंगोट आंदोलन करुन कोपरगावच्या सकल मराठा बांधवांनी प्रशासनासह सर्वांचे लक्ष वेधले.