जगाला बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची गरज – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : जगाला समता, अहिंसा, शांतता, ज्ञान व मानवतावादाचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध हे प्रयत्नवादी, अहिंसावादी, बुद्धिप्रामाण्यवादी होते. भगवान गौतम बुद्ध यांचे तत्त्वज्ञान सर्वव्यापी आहे. मानवी जीवन आनंददायी, सुंदर करण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची व समतावादी विचारांची आज जगाला खरी गरज आहे, असे मत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.

कोपरगाव येथील बुद्ध धम्म प्रसारक मंडळ (ट्रस्ट) तर्फे विश्वशांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती शुक्रवारी (५ मे) नगर-मनमाड महामार्गावरील लुंबिनी उपवन बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित राहून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

तसेच सर्वांना तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती व बुद्ध पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. यानिमित्त लुंबिनी उपवन बुद्ध विहारमध्ये धम्म ध्वजारोहण, सामूहिक धम्म-बुद्ध वंदना, त्रिशरण, पंचशील पठण व ग्रहण, भिक्खू संघाची धम्मदेसना, स्नेहभोजन आदी कार्यक्रम झाले. 

कोल्हे म्हणाले, भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि समतेचा अग्निस्रोत म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध. ऐन तारुण्यात म्हणजे तिशीत असताना त्यांनी सुंदर राजवाडा, सुंदर महाराणी, सुंदर पुत्र आणि आनंददायी जीवनाचा त्याग केला. मानवी जीवन दुःखमय आहे, त्याचे कारण तृष्णा आहे. तृष्णेचा नाश केला तर दुःखातून मुक्ती मिळते. यावर अष्टांगिक मार्ग हा उपाय आहे. दुःख नष्ट करता येते, हा प्रयत्नवाद भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितला.

वैशाख महिन्यातील पौर्णिमेला तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनात पाच अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे वैशाखी पौर्णिमेला त्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारुण्य आणि प्रेम यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व ओतप्रोत भरले होते. त्यांनी ऐश्वर्यसंपन्न जीवनाचा त्याग करून लोककल्ल्याणासाठी आयुष्याची अखंड ५० वर्षे गावोगावी परिभ्रमण केले. त्यांच्या विचाराने जनसमुदाय प्रभावित झाला. दुःखी जीवनाला चमत्काराने किंवा कर्मकांडाने नव्हे, तर प्रयत्नाने सुखी बनवता येते. जिवंत माणसांचा विचार करा. कसल्याही थोतांडात अडकू नका. अत्त दीप भव म्हणजे स्वयंप्रज्ञ व्हा, स्वतः ज्ञानी व्हा आणि स्वतः ज्ञानी झालेल्या व्यक्तीला जगात कोणीही फसवू शकत नाही, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

निसर्गात घडणाऱ्या घटनांचे शास्त्रीय विश्‍लेषण करणारे जगातील पहिले शास्त्रज्ञ म्हणजे भगवान गौतम बुद्ध होत. गौतम बुद्धांचे विचार, तत्त्वज्ञान आणि कार्य हे चमत्कारावर नव्हे, तर ज्ञानावर आधारलेले आहे. भगवान गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना करून संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा आणि शांती याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी मानवाच्या कल्याणासाठी शांतीचा मार्ग सांगितला. मानवी जीवनातील दु:ख निवारण्यासाठी गौतम बुद्धांनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी असे आठ मार्ग सांगितले होते. त्यांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा वापर करून त्यांच्या विचारांप्रमाणे प्रत्येकाने आचरण करणे गरजेचे आहे, असेही विवेक कोल्हे यांनी सांगितले.

यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे तेलंगणा राज्याचे अध्यक्ष प.पू. भिक्खू डॉ. राष्ट्रपाल महाथेरो, अखिल भारतीय भिक्खू संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव प.पू. भिक्खू कश्यपजी, अखिल भारतीय भिक्खू संघाचे सदस्य प.पू. भिक्खू दीपरत्न (नांदेड), सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, रिपाइं (आठवले गट) नेते दीपकराव गायकवाड, महाराष्ट्र बँकेचे शाखाधिकारी अनिल जगताप, ॲड. भास्करराव गंगावणे, ॲड. नितीन गंगावणे, ॲड. सुरेश मोकळ, बुद्ध धम्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रंभाजी रणशूर, उपाध्यक्ष भीमराज गंगावणे, सचिव रमेश हेगडमल,

अनिल पाईक, साहेबराव कोपरे, अरविंद विघे, संजय कांबळे, विजय त्रिभुवन, राहुल धीवर, वसंतराव गाडे, नानासाहेब रणशूर, तुकाराम रणशूर, रमेश मोरे, नानासाहेब रोकडे, गोरख सोनवणे, प्रल्हाद जमधडे, मोतीराम शिंगाडे आदींसह बुद्ध धम्म प्रसारक मंडळाचे सदस्य, बौद्ध उपासक व उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी सुनंदा अनिल जगताप, अनिल रामदास जगताप (येवला), सविता भीमराज गंगावणे, भीमराज नारायण गंगावणे (कोपरगाव) यांच्या वतीने भोजनदान करण्यात आले.

4 Attachments • Scanned by Gmail