कोल्हे साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचा सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार जाहिर

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटच्यावतीने दिला जाणारा माजी मुख्यमंत्री स्व.विलास देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांस जाहिर झाला आहे. त्याचे वितरण माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे, महासंचालक संभाजी कडु, माजी महासंचालक शिवाजी देशमुख आदिंच्या हस्ते ११ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता पुणे (मांजरी बुद्रुक) येथे प्रदान करण्यांत येणार आहे. एक लाख रूपये रोख, मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप असुन रेणा सहकारी साखर कारखान्याने सदरचा पुरस्कार पुरस्कृत केला आहे. 

वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटने सदर पुरस्कारासाठी जे निकष ठरविले होते. त्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची प्रेरणा घेत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आजी माजी सर्व संचालक, ऊस उत्पादक सभासदांच्या सहकार्याने कारखान्याची घौडदौड यशस्वीरित्या सांभाळत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी कार्यक्षम वापर केलेला आहे. 

युवानेते विवेक कोल्हे यांनी अत्यंत कमी वयात देश विदेशातील साखर कारखानदारीचा अभ्यास करून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची आधुनिक विचारसरणी जपत त्यानुरूप सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला सिध्द करत दैनदिन गाळप क्षमतेसह विविध रासायनिक उपपदार्थ निर्मीतीत यशस्वी मार्गाक्रमण करत निर्माण होणा-या अडी अडचणींचा सोडवणुक करून ई महिंद्रा कृषी उपग्रह कार्य प्रणालीच्या सहाय्याने उस लागवडीपासून ते गाळपापर्यंतचे नियोजन, ड्रोन फवारणी तंत्र उपलब्ध करून जैविक खतासह संजीवनी सेंद्रीय खत सभासद शेतक-यांना अनुदानावर उपलब्ध करून देत खेळत्या भांडवलावरील व्याजाचा खर्च कमी करून चांगला नक्त मुल्यांक निर्देशांक ठेवला.

शेतकऱ्यांच्या बांधावर थेट ऊस लागवडीसह विविध घटकांचे मार्गदर्शन देत आहे. या पुरस्कारासाठी वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटने वेगवेगळ्या प्रकारचे २५ निकष ठेवले होते. ते सर्वच्या सर्व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने परिपुर्ण केल्याने सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारासाठी निवड झाली त्याबददल अनेकांनी अभिनंदन केले आहे.