बहुउद्देश साध्य करणाऱ्या गोदाकाठ महोत्सवाने जिल्ह्यासह राज्यात ही ओळख निर्माण केली – चैताली काळे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : आपले घर, संसार सांभाळून समाजासाठी योगदान देणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान त्याला मिळणारी सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड व बचत गटाच्या महिलांचा होणारा आर्थिक विकास असे बहुउद्देश साध्य करणाऱ्या गोदाकाठ महोत्सवाने जिल्ह्यासह राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून गोदाकाठ महोत्सवाची दखल महाराष्ट्र शासनाने देखील घेतली आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी केले आहे.

मागील दहा वर्षापासून सुरू असलेल्या महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा, महिला मंडळ कोपरगाव तसेच राज्य शासनाच्या महिला विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘गोदाकाठ महोत्सव २०२४’ चे उदघाटन’ प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे होत्या.

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, अडीच दशकापूर्वी ज्या काळात बचत गट काय असतो याची महिला भगिनींना माहिती नव्हती. त्यावेळी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे यांनी आपल्या मंडळाच्या महिलांना घेवून गावागावात जावून महिला भगिनींना बचत गटाची संकल्पना समजावून सांगीतली व बचत गट निर्माण केले. आज मोठ्या प्रमाणात वाढलेली बचत गटाची संख्या हे प्रियदर्शनी महिला मंडळाच्या सामुहिक प्रयत्नांचे यश आहे.

महिला भगिनी दरवर्षी आतुरतेने गोदाकाठ महोत्सवाची वाट पाहत असतात. बचत गटाच्या महिला भगिनींना आर्थिक आधार देण्यासाठी मागील दहा वर्षापासून सुरु करण्यात आलेला ‘गोदाकाठ महोत्सव’ आज महिलांसाठी आधारवड बनला असून त्यामुळे महिला भगिनींचा आर्थिक उत्कर्ष करण्याचा हेतू साध्य होत असल्याचे दिसून येत आहे. महिला भगिनी एकत्र आल्या तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

त्यासाठी महिलांचे संघटन होणे गरजेचे असून बचत गटाच्या चळवळीला व्यापक स्वरूप देणे गरजेचे आहे. समस्त माता भगिनींच्या मागे आ.आशुतोष काळे खंबीरपणे उभे असून त्यांच्या सहकार्याने बचत गटाच्या महिला भगिनीचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही चैताली काळे यांनी यावेळी दिली.