ढाकणे पॉलिटेक्निक म्हणजे दक्षिणेतील कामधेनूच – सुधाकर जोशी

शेवगाव प्रतिनिधी, दि.०६ :  शेवगाव सारख्या ग्रामिण भागातील मुला-मुलींना त्यांच्याच भागात रोजगार निर्मितीचे, स्वतःच्या पायावर उभे राहून  आत्मनिर्भर बनण्याचे शिक्षण कै. सौ. सुनिता एकनाथ ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज या तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या निर्मिती मुळे शक्य झाले आहे. दक्षिणेतील ती कामधेनुच ठरली आहे. अशा शब्दात अमृतवाहिनी सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी यांनी ढाकणे पॉलिटेक्नीकचा गौरव केला.

जोशी व बँकेचे कार्यकारी अधिकारी वाणी यांनी नुकतीच या तंत्रनिकेतनला सदिच्छा भेट दिली. त्यावेळेस ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, तथा ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत ढाकणे, संस्थेचे प्राचार्य डॉ. आर.एच अत्तार, मुख्याध्यापक  रावसाहेव वर्पे, विष्णूपंत रहाटळ आदि मान्यवर उपस्थित होते.    

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत ढाकणे यानी संस्थेची माहिती दिली. केदारेश्वर ग्रामिण विकास प्रतिष्ठाणचे राक्षी येथे सन २०१० पासून तंत्रनिकेतन तर सन २०१६ पासून समर्थ प्रायव्हेट आयटीआय सुरू असून चालू शैक्षणिक वर्षापासून समाजभूषण एकनाथ ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सुरू करण्यात आले आहे.

राक्षीच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयातून आतापर्यंत १८६९ विद्यार्थांनी शिक्षण पूर्ण केले असून पैकी १०६९ विद्यार्थी विविध शासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. तर उर्वरित विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये विशेष सवलती उपलब्ध आहेत. संस्थेचा निकाल सर्व परीक्षांमध्ये ९५ टक्केपेक्षा अधिक लागला आहे. याचीच दखल घेत संस्थेस तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.