कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : गरीब, होतकरू हुशार विद्यार्थांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणीच्या प्रसंगी योग्य वेळी मदत मिळाली तर त्यांच्या जीवनात काय घडू शकते. हे हेल्पिंग हँड्सने मदत केलेल्या विद्यार्थामध्ये दिसून येत आहे. इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणाऱ्या हेल्पिंग हँड्स संस्थेचे हे कार्य गौरवास्पद आहे. असे प्रतिपादन मणिलाल नानावटी व्होकेशनल प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका शोभाताई सुपेकर यांनी केले.
आर्थिकदृष्ट्या गरीब, हुशार, होतकरू विद्यार्थांना हेल्पिंग हँड्स या स्वयंसेवी संस्थेच्यामार्फत उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचे धनादेश वाटप कार्यक्रम प्रसंगी सुपेकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी होते.
समाजात चांगल्या कामाला मदत करणारे अनेक संस्था, दानशूर आहेत. मात्र नेमकी कुठे मदत करावी हे समजून येत नाही. अशा वेळी दाते आणि ज्यांना मदत हवी आहे. यांच्यातल्या दुवा होण्यासाठी हेल्पिंग हँड्ससारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा. समाज परिवर्तन कसे घडते हे हेल्पिग हंड्सच्या कार्यातून अधोरेखित झाले. – शोभा सुपेकर संचालिका, मणिलाल नानावटी व्होकेशनल प्रशिक्षण केंद्र पुणे.
प्रास्ताविकात संस्थापक दत्तात्रेय खेमनर म्हणाले, गरजू, होतकरू व गरीब विद्यार्थांना उच्च शिक्षणासाठी चालू वर्षी ३८ विद्यार्थ्यांना आठ लाख ८० हजाराची मदत देण्यात आली. आज अखेर गरजू, होतकरू व हुशार विद्यार्थांना ५१ लाख १७ हजार रुपयांची मदत केली आहे. एका विद्यार्थ्याला मुत्र पिंड शस्त्रक्रियेसाठी १ लाख ७५ हजाराची मदत मिळवून दिली.
अध्यक्ष सचिन सूर्यवंशी यावेळी म्हणाले, संवेदनशील माणसांनी प्रतिकूल परिस्थितीत निस्वार्थीपणे घेणारांच्या गर्दीत गरजूंना दिलेला मदतीचा हात गरजूंच्या जीवनाला कलाटणी देणारी नवसंजीवनी ठरते. या बळावर गरजूनी जिद्द, कौशल्य, विक्रमी यश मिळवले तरच या मदतीच्या हातांच्या जीवनाचे सार्थक आहे. सूत्रसंचालन राजेंद्र कोयटे यांनी केले तर आभार विठ्ठल शिंदे यांनी मानले.