के.जे.सोमैया महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधुन सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. या व्याख्यानासाठी साईबाबा संस्थान शिर्डी महाविद्यालयाच्या हिंदी विभागप्रमुख डॉ.सोनाली हरदास यांना आमंत्रित करण्यात आले होते.

त्यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास रेखाटतांनाच आजच्या स्त्रियांना लढण्याची प्रेरणा सावित्रीबाईंनीच दिल्याचे सांगितले. त्यापुढे असेही म्हणाल्या की, सावित्रीबाई खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली. शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच अन्य सामाजिक क्षेत्रांतही परिवर्तनाचे काम करून स्त्रियांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव यांनी आपल्या मनोगतात भारत हा स्त्री शक्तीचा देश आहे. या समाजात अनेक महापुरुष हे स्त्री मार्गदर्शनामुळे घडले.

सावित्रीबाई फुले यांचे महान कार्य याचे उदाहरण आहे. प्रतिकूल परिस्थितीत अनेक संघर्षाचा सामना करून सावित्रीबाई सारख्या कर्तृत्ववान महिलांनी या देशाचा नावलौकिक वाढविल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. नीता शिंदे यांनी सावित्रीबाई फुले आजच्या महिलांसाठी प्रेरणा शक्ति असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरी आहेर यांनी तर आभार डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. वर्षा आहेर, प्रा. के. देशमुख, प्रा.येवले, प्रा. गख्खड यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.