शेवगाव फेस्टिवला महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद – आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि.०९ :  जीवनातील कौटुंबिक सह विविध भूमिका समर्थपणे पेलून घराला घरपण प्राप्त करून देण्यात महिलांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण असते. केवळ जागतिक महिला दिनाच्या दिवशीच नव्हे तर इतर वेळेस देखील मानसन्मान मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

येथील ग्रामीण परिसरातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे. यासाठी आमदार राजळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय शेवगाव फेस्टिवल उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी आ.राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

शहरातील नारीशक्ती, सावित्री, हिरकणी महिला बचत गटाच्या सहकार्याने येथील आखेगाव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात शेवगाव मिस, शेवगाव वुमन्स, तसेच महिला व मुलींसाठी नृत्य स्पर्धा तसेच शॉपिंग, खानपान सह विविध प्रकारचे ४० स्टॉल उभारण्यात आले आहेत. रविवार (दि.१०) पर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध स्पर्धा पार पडणार आहेत. फेस्टिवल मध्ये तीन्ही दिवस भरगच्च कार्यक्रम असून महिलांचा उत्तयुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

उपस्थित प्रेक्षक महिलांसाठी लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आले असून त्यात दररोज तीन पैठणी जिंकण्याची संधी उपस्थित महिलांना मिळणार आहे. उपक्रमाच्या प्रमुख संयोजीका सीमा बोरुडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सावरकर, रत्नमाला फलके, राजश्री रसाळ, सुजाता फडके यांचे सह महिलांची मोठी उपस्थिती होती. विविध स्पर्धेत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी दि.१० रोजी संपन्न होणार आहे.

परीक्षक म्हणून प्रा. नितीन मालानी, वसुधा सावरकर, मीनाक्षी शिंदे, अशोक कदम काम पाहत आहेत. यावेळी माजी नगरसेवक सागर फडके, महेश फलके, भाजप शहर अध्यक्ष बापू धनवडे, रिंकू बंब, कैलास सोनवणे, मच्छिंद्र बर्वे, किरण पुरनाळे, नारायण मडके, अमोल माने, किरण काथवटे, यांची उपस्थिती होती. दीपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वरी भागवत यांनी आभार मानले.