दुहेरी हत्याकांडाचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्याची मागणी

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : मारवाडी गल्लीतील बलदवा यांच्या घरावर चोरट्यांनी केलेल्या हल्यात दीर व भावजयी अशा दोघांची निघृण हत्या झाल्याची घटना दि. २३ जून २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या दुहेरी हत्याकांडाचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्याची मागणी मुख्यमत्री एकनाथ शिदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, युवा सेना जिल्हा प्रमुख साईनाथ आधाट, तालुका प्रमुख आशुतोष डहाळे, यांचेसह बलदवा परिवारातील सदस्यांनी मुख्य मंत्री शिंदे यांची समक्ष भेट घेऊन दिलेल्या निवेदनाद्वारे केली असता मुख्यमंत्र्यानी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती डहाळे यांनी दिली.

निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव शहरातील मारवाडी गल्लीतील बलदवा यांच्या घरावर चोरट्यानी दरोडा टाकून केलेल्या मारहाणीत व्यापारी गोपीकिसन गंगाबिशन बलदवा व भावजयी पुष्पाताई हरिकिसन बलदवा या दीर भावजयीचे दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना दीड महिन्या पूर्वी घडली. नगरच्या गुन्हा अन्वेशन विभागाच्या पोलिस पथकाने या घटनेतील संशयीत आरोपीच्या मुसक्या आवळण्याची यशश्वी कामगीरी केली.

त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील, परिक्षाविधीन पोलिस अधिक्षक बी चंद्रकांत रेड्डी, यांच्या मार्गदशनाखाली शेवगाव पोलिस पथकाने या घटने मागील धागेदोरे उलगडण्यास यश मिळविले. भर वस्तीत घडलेल्या या हत्या कांडामुळे शेवगावातील नागरिक आजही भयभीत आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपीवर खुनासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यास कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे परिसरात सातत्याने सुरु असलेल्या चोऱ्यामाऱ्याच्या घटनांना चाप बसणार आहे.

याकरिता बलदवा परिवारातील दुहेरी हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचे आदेश संबंधित विभागास देण्याची मागणी निवेदनात केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याच निवेदनावरच अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांना तपासून तात्काळ प्रस्तावित करावे. असा आदेश दिला.