चासनळी भागात देहदानाची चळवळ जोमात

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : तालुक्यातील चासनळी गाव परीसरात अवयवदान व देहदानाचे प्रबोधन होत असुन अनेक व्यक्तींनी तसे संकल्पपत्र भरून दिले आहे. देहदान व अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने गावकऱ्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. या कामी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी पुढाकार घेतला आहे.

        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ‘मन की बात’ मध्ये अवयवदानाचे महत्व विषद केले आहे. सरकार त्यासाठी अनेक योजना आखत आहे. परंतु चास ( नळी) भागात त्या अगोदर ही चळवळ सुरु झाली आहे. काही दिवसांपुर्वी अंनिस कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांच्या आई सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे यांचे निधन झाले. त्यांचे देहदान करण्यात आले. त्यांच्या श्रद्धांजली सभेत देहदान व अवयवदान यावर सक्रिय कार्यकर्ते सुनील देशपांडे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते.

त्या कार्यक्रमात त्यांची प्रेरणा घेऊन पंधरा व्यक्तींनी देहदानाचे संकल्पपत्र  सादर केले होते. अजुनही अनेक व्यक्ती देहदान व अवयवदान याबद्दलचे संकल्पपत्र सादर करत आहे. या दाना बद्दल समाजात अज्ञान व गैरसमज असल्याने प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी कृष्णा चांदगुडे प्रयत्नशील आहे.

मोफत व्याख्यानासाठी किंवा माहितीसाठी ९८२२६३०३७८ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.देहदानामुळे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना संशोधन करण्यात मदत होते. तर  एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे आठ रुग्णांचे जीव वाचू शकतात.त्यामुळे इच्छुक व्यक्तींनी समोर येऊन संकल्प पत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.