दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा दहीहंडी उत्सव रद्द – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : दरवर्षी कोपरगाव शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा अर्थात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी संपूर्ण मतदार संघात दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे यावर्षीचा दहीहंडी उत्सव दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघाकडे पावसाने पाठ फिरविल्यामुळे संपूर्ण मतदार संघात दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी उसनवार व कर्ज काढून खरीप हंगामाची पिके उभी केली होती. परंतु जवळपास एक महिन्यापासून मतदार संघात पाऊस पडला नाही. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगामातील पिके जळून गेली आहेत. त्यामुळे  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होवून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

आपले सण, उत्सव साजरे करण्यामागे परंपरा व संस्कृती आहे. त्यामुळे आजही कम्प्युटर, मोबाइलच्या काळातही आपल्या सण-उत्सवांचे महत्त्व कमी झालेले नाही. या सण उत्सवाच्या परंपरा जपण्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दरवर्षी कोपरगाव शहरात भव्य-दिव्य स्वरुपात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

परंतु यावर्षी निर्माण झालेल्या दुष्काळामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक अडचणीत असून त्याचा परिणाम कोपरगाव शहरासह मतदार संघातील बाजारपेठेवर झाल्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांबरोबरच व्यापारी वर्ग देखील अडचणीत सापडला आहे. अशा अडचणीच्या परिस्थितीत कोणताही उत्सव साजरा करणे योग्य नाही. त्यामुळे दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दहीहंडी उत्सव रद्द केल्यामुळे गोविदांची काहीशी निराशा होणार आहे. परंतु अशा दुष्काळाच्या व अडचणींच्या परिस्थितीत शेतकरी, व्यापारी वर्ग व सर्व सामान्य जनतेचा विचार करून यावर्षीचा श्रीकृष्ण जन्मसोहळा अर्थात दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे. परंतु पुढील वर्षी अशी परिस्थिती राहणार नाही असा आशावाद व्यक्त करून पुढील वर्षी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा केला जाईल अशा आमदार काळे यांनी व्यक्त केली आहे.