समन्यायी पाणी वाटप कायद्याची फळे मतदारसंघातील शेतकरी भोगत आहे – स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : समन्यायी पाणी वाटप कायदा कोपरगाव विधानसभा मतदारसंघासह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. सध्या पावसाअभावी कोपरगाव मतदारसंघात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, अशा परिस्थितीत समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडल्यास कोपरगावसह नगर जिल्ह्यातील जनतेच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

त्यामुळे ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

सन २००५ मध्ये तत्कालीन सरकारने बनविलेला समन्यायी पाणी वाटप कायदा नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे असून, समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेत दरवर्षी नाशिक-नगरचे पाणी मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात सोडले जात असल्याने बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आली आहे. उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील दारणा, गंगापूर धरण समूहातील धरणांतून जायकवाडीत पाणी सोडले जाते. त्यामुळे गोदावरी डावा व उजवा कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नसल्याने या परिसरातील शेती उद्ध्वस्त झाली आहे.

या जाचक व अन्यायकारक कायद्याची फळे आज गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी भोगत आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व जनतेवर अन्याय करणारा हा कायदा विधिमंडळात संमत केला जात असताना या मतदारसंघाच्या तत्कालीन लोकप्रतिनिधींनी या कायद्याला कशी काय संमती दिली? असा परखड सवाल स्नेहलताताई कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. 

स्थानिक आमदार म्हणतात की, मी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी २१०० कोटींचा निधी आणला. एवढा निधी जर मिळाला असता तर गोदावरी खोऱ्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला असता. स्थानिक आमदारांना फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय लागलेली आहे. कृष्णा खोऱ्यातील कामाला ज्याप्रमाणे गती दिली होती त्याप्रमाणे पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रकल्पास गती देण्यात यावी, जेणेकरून नगर, नाशिक जिल्ह्यांसह मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल.

नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा यांच्यातील पाण्याचा वाद कायमस्वरूपी मिटविण्यासाठी सर्व पक्षांच्या आमदारांनी, लोकप्रतिनिधींनी व नेत्यांनी एकत्र येऊन पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेला ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रकल्पास गती देण्यासाठी तसेच या प्रकल्पास केंद्र व राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या, जनावरांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आज मतदारसंघातील शेतकरी पाण्यासाठी तळमळत आहे. विजेचे प्रश्नही गंभीर बनले आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधी मात्र त्याची गांभीर्याने दखल न घेता चमकोगिरी करण्यातच मग्न आहेत, हे दुर्दैव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

विद्यमान लोकप्रतिनिधींनी चमकोगिरी थांबवून दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे; पण तसे होताना दिसत नाही. खोटे बोलून, खोटी आश्वासने देऊन किती दिवस जनतेची फसवणूक करणार?  जनता सूज्ञ आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींच्या भूलथापांना जनता आता मुळीच बळी पडणार नाही, असे स्नेहलताताई कोल्हे यांनी म्हटले आहे. 

कोपरगाव तालुक्यात पाण्याचा व विजेचा खेळखंडोबा सुरू असून, दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसह सर्वच समाजघटक हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत केवळ निवेदने देऊन, नाममात्र बैठका घेऊन आणि कोरडी आश्वासने देऊन काहीच होणार नाही तर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, वीज, चारा व रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने सोडवला पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने तात्काळ ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अशी सूचना स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पावसाअभावी पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याअभावी धोक्यात आलेली खरीप पिके वाचविण्यासाठी तातडीने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी सोडणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला असल्याने प्रशासनाने याची तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन हे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. चारा डेपो सुरू करून शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा पुरवावा लागणार आहे. सध्याच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीत शासनाच्या धोरणाप्रमाणे शासकीय यंत्रणेने ताबडतोब आवश्यक त्या उपाययोजना करून शेतकऱ्यांना व जनतेला दिलासा देण्याची गरज आहे.

सरकारने अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघावर पाण्याच्या बाबतीत झालेला अन्याय त्वरित दूर करून मतदारसंघातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी हक्काचे पाणी द्यावे, दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना त्वरित करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत आदी मागण्याही स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्या आहेत.