मुळा उजव्या कालव्यातून खरीप हंगामाचे आवर्तन सुटणार – आमदार राजळे

शेवगांव प्रतिनिधी, दि ३० : मुळा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात कमी पाऊस झाल्याने क्षेत्रीय परिस्थितीनुसार व लाभधारक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मुळा धरणातून दिनांक ०१ सप्टेंबर २०२३ रोजी खरीप हंगामाचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याचा दिलासा आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिला आहे.

         यावेळी आ. राजळे म्हणाल्या,  हंगामाचे आवर्तन सोडणेबाबत दि. २८ ऑगस्ट २०२३ रोजी  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व संबंधीत विभागाची अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानुसार आवर्तन सोडण्याचा हा निर्णय घेण्यात आला असून सध्या अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे शेतातील पिकांनी माना टाकल्या असल्याने शेतकऱ्यांनी आवर्तन सोडण्यासाठी मागणी केली होती.

सदर आवर्तनाचे टेल टू हेड नियोजन करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी आवर्तन काळात अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन ही आमदार राजळे यांनी केले.