शेवगावातील १९ गावात उभारला ऑक्सिजन पार्क

बिहार पॅटर्न अंतर्गत तब्बल १६,६०० वृक्ष लागवड

वृक्षारोपण करणे सोपे, अनेकदा वृक्षारोपणाची कोटीच्या कोटी उड्डाणे आपण ऐकतो. म्हणूनच वृक्ष लागवडीपेक्षा  वृक्ष संगोपनाला  प्राधान्य देण्याच्या निश्चयातून  रोपे लवकर रुजावीत, एखादेही रोप जळू नये. म्हणून वृक्ष लागवड करतांना  मुळातच दीड दोन वर्षाच्या मोठ्या रोपांची निवड करतांना गटविकास अधिकारी डोके यांनी जातीने लक्ष घातल्यTने ही सर्व गावे आज  वृक्षराईने नटली असून परिसर हिरवाईने फुलला आहे.

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : मध्यंतरी कोविड महामारीने सर्वत्र थैमान घातले. या काळाने ऑक्सीजनचे महत्व अधोरेखित केले. त्यातूनच प्रेरित होऊन महात्मा गांधी शासकीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील बिहार पॅटर्न अंतर्गत शेवगाव तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीमध्ये  सन २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये तब्बल १६ हजार ६००  वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपन करण्यात आले.

टीम लीडर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी ऑक्सिजन पार्कची संकल्पना राबवित तांत्रिक अडचणीवर मात करीत विविध विभागाशी समन्वय साधून ही किमया साध्य केली. या माध्यमातून या गावांत आज वनराई  नटली असून ८३ मजुरांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

        या उपक्रमाद्वारे घोटण, कऱ्हे टाकळी, वाघोली, आव्हाने बुद्रुक, वडूले खुर्द, ठाकूर निमगाव व तळणी या गावातील स्मशानभूमी आणि गावांतर्गत रस्त्याच्या दुतर्फा फुलांची, शोची, जंगली वृक्षाची लागवड करण्यात आली. तर वरुरला शाळा परिसरात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

       या योजनेत शासनाकडून रोपे मिळत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायती या संदर्भातील प्रस्ताव दाखल करण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र वृक्षांच्या संगोपणासाठी अनुदान मिळते. गटविकास अधिकारी डोके यांनी डोके लावून नेमक्या या मुद्याचा  लाभ घेत सामाजिक वनीकरणामार्फत समन्वय साधून ग्रामपंचायतींना मोफत रोपाचा पुरवठा करून १९ ग्रामपंचायतींना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित केले.

        रोपे निवडताना दीड-दोन वर्षाची मोठी झालेली रोपे निवडली. त्यामुळे ती लवकर रोपली व एकही रोप वाया न जाता चांगली वाढली.  या योजनेतील वृक्ष लागवडीची देखभाल करण्यासाठी २०० वृक्षासाठी एका मजूराच्या  नेमणूकीस मान्यता असल्याने या ग्रामपंचायतीमध्ये एकूण ८३ मजुरांना रोजंदारी उपलब्ध झाली आहे.

      या कामी पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी कैलास हिरे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी संतोष शिंदे, कृषी अधिकारी राहुल कदम, कृषी विस्तार अधिकारी दिगंबर भांड, मनरेगा कक्ष प्रमुख संजय जगताप, तसेच संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, रोजगार सेवक या सर्वांनी आत्मीयतेने सहकार्य केल्याचे डोके यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

      वृक्षारोपण करणे सोपे, अनेकदा वृक्षारोपणाची कोटीच्या कोटी उड्डाणे आपण ऐकतो. म्हणूनच वृक्ष लागवडीपेक्षा वृक्ष संगोपनाला प्राधान्य देण्याच्या निश्चयातून रोपे लवकर रुजावीत, एखादेही रोप जळू नये. म्हणून वृक्ष लागवड करतांना  मुळातच दीड दोन वर्षाच्या मोठ्या रोपांची निवड करतांना गटविकास अधिकारी डोके यांनी जातीने लक्ष घातल्यTने ही सर्व गावे आज वृक्षराईने नटली असून परिसर हिरवाईने फुलला आहे.

          या मोहिमेत आव्हाने बुद्रुकला सर्वाधिक २ हजार २०० वृक्षाची लागवड झाली तर गोळेगावला २ हजार,  वाघोलीला  व मजलेशहरला प्रत्येकी १ हजार २०० , सामनगाव व वरुर बुद्रुकला प्रत्येकी १ हजार ,तर बोडखे, अमरापूर, घोटण, ठाकूर निमगाव, या चार गावात प्रत्येकी ८०० तर क-हेटाकळी, एरंडगाव समसुद, वडूले खुर्द, आखेगाव, राक्षी, ताजनापूर या सहा गावात प्रत्येकी  प्रत्येकी ६०० तर खामपिंपरी, कांबी व तळणी या गावात प्रत्येकी ४०० अशा १६ हजार ६०० वृक्षांची लागवड करून त्यांची उत्तम प्रकारे जोपासना करण्यात आली आहे. याच योजनेचे लाभार्थी, वाघोली ग्रामपंचायतीस २०२२चा माझी वसुंधरा  योजनेअंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून दीड कोटी रुपयाच्या पुरस्काराने ग्रामपंचायतीस सन्मानित करण्यात आले आहे.