खेळामुळे जीवनाला शिस्त लागते – बिपीनदादा कोल्हे

 संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये राष्ट्रीय  एरोबिक्स स्पर्धांचे उद्घाटन   

                 
कोपरगांव प्रतिनिधी, दि.७ : खेळ हा जीवनाचा अविाभाज्य घटक असुन शालेय जीवनात कोणताही खेळ खेळल्यास त्या खेळाच्या हार जीत मधुन यश आणि अपयशही पचविण्याची सवय मनाला होते. कोणताही खेळ हा नियमानुसारच खेळला जातो, खेळात शिस्त पाळावीच लागते, त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातही शिस्त लागते, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष व श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित शिर्डी  येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये केद्रिय माध्यमिक शिक्षण  मंडळाच्या (सीबीएसई) वतीने राष्ट्रीय  एरोबिक्स चॅम्पियन स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी श्री बिपीनदादा कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भुषविले.

यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे, भारतीय क्रीडा एरोबिक्स आणि फिटनेस फेडरेशन (आयएएसएफएफ, इंडिया) चे अध्यक्ष संतोष देशमुख, सचिव संतोष  खैरनार, निरीक्षक अखिलेश कुमार रावत, अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले व स्कूलच्या प्रिन्सिपल डायरेक्टर व्यासपीठावर उपस्थित होते.

या स्पर्धेत महाराष्ट्र , कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू, हरियाना, दिल्ली, पंजाब या राज्यांसह देशातून  ७० पेक्षा अधिक सीबीएसई स्कूल्स मधुन सुमारे ५०० स्पर्धकांनी हजेरी लावली. एरोबिक्स हा शारिरीक व्यायामाचा प्रकार असुन तो संगीताच्या तालावर खेळला जातो. यामुळे शरीराची लवचिकता, स्नायुंची ताकद आणि हृदयाची कार्यक्षमता वाढते.

कोल्हे पुढे म्हणाले, प्रत्येक स्पर्धेत प्रत्येकाला यश मिळलेच असे नाही, परंतु पहिल्या स्पर्धेचे यश अथवा अपयश हे पुढील स्पर्धेची अधिकची तयारी असते. खेळातुन खिलाडु वृत्ती दाखवा, श्री साईबाबंच्या मंत्रानुसार ‘श्रध्दा आणि सबुरी ठेवा’, यश  आपोआप आपल्याकडे येईल.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना जाधव म्हणाले की, खेळामुळे आरोग्य उत्तम राहुन स्मरणशक्ती वाढते. आरोग्य उत्तम राहील्यास आजार आपल्यापासुन दुर राहतो. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणींना उजाळा देत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्वांचे स्वागत करून स्कूलमध्ये अभ्यास केंद्रस्थानी ठेवत विविध सुविधा, क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण, व्यावसायिक कौशल्य, नृत्य, संगीत, जलतरण, डे बोर्डींग सुविधा, आदींची माहिती दिली. मुलींची प्रतिनिधी जिया पारख हीने सर्व स्पर्धकांना शपथ दिली. शाळेतील विध्यार्थ्यांनी घोड्यांवर स्वार होवुन प्रमुख मान्यवरांना मानवंदना दिली. मान्यवरांच्या  हस्ते मशाल पेटवुन स्पर्धांचे उद्घाटन संपन्न झाले.