तालुक्यातील ३४ गावांची खरिप पिकांची आणेवारी जाहीर

शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ : तालुका प्रशासनाने तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या ३४ गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केली असून ती ५० पैशाच्या आत असल्याची माहिती तहसीलदार छगनराव वाघ यांनी दिली आहे.
या अगोदर तालुक्यातील सर्वच्या सर्व ३४ गावांची नजर आणेवारी व त्या पाठोपाठ सुधारित आणेवारी ५० पैशा पेक्षा अधिक जाहीर करण्यात आली होती. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. 

तालुक्यात सप्टेंबर व ऑक्टोंबर या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतक-यांच्या बाजरी, कापूस, सोयाबीन, तूर, मुग, भाजीपाला, फळबाग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान  झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला होता. अतिवृष्टीचा विविध पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसून एकंदरीत खरीप हंगाम शेतक-याच्या हातून निसटल्याने  शेतकरी खचला होता.

अतिवृष्टीमुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव, बालमटाकळी, लाडजळगाव आदी गावांना जिल्ह्याचे पालक मंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नोव्हेंबर  महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाहणी दौरा करून अतिवृष्टीमुळे शेवगाव तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे मान्य केले होते. यावेळी तालुक्यातील विविध मंडळात अतिवृष्टीचीही नोंद झाली होती. एकंदरीत जास्तीच्या पावसामुळे पिके सडली, जमिन  उपळली पावसाचे पाणी बरेच दिवस शेतात साचल्याने शेतक-यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.

मात्र त्यावेळी महसूल प्रशासनाने तालुक्यातील खरिपाच्या ३४ गावांची नजर आणेवारी व त्या पाठोपाठ सुधारित पैसेवारी चक्क ५० पेक्षा अधिक जाहीर केल्याने शेतक-यांना अपेक्षित मदत, हंगामात घेतलेल्या पीक कर्जाची वसुली थांबवून प्रसंगी कर्जाचे पुनर्गठन, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्याची परीक्षा शुल्क माफी आदी विविध प्रकारच्या सवलतीपासून वंचित राहण्याची वेळ येणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत प्रसंगी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविण्याचा निर्धार जाहीर केला होता. मात्र आता महसूल प्रशासनाने तालुक्यातील खरिपाच्या ३४ गावांची अंतिम आणेवारी ५० पैशाच्या पेक्षा कमी जाहीर केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी समाधानाचा सूर व्यक्त केला असून प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

       तालुका प्रशासनाने जाहीर केलेली तालुक्यातील खरीप गावांची अंतिम पैसेवारी पुढील प्रमाणे – बेलगाव, दिवटे, कोनोशी, मुरमी, शोभानगर, शेकटे खुर्द, थाटे, ठाकूर निमगाव, सेवा नगर (४७ पैसे), आधोडी, अंतरवाडी बु, बाडगव्हाण, बोधेगाव, गोळेगाव, हसनापूर, कोळगाव, लाडजळगाव, माळेगाव ने, नजीक बाभूळगाव, राक्षी, राणेगाव, सालवडगाव, सुळेपिंपळगाव, सोनेसांगवी, शिंगोरी, शेकटे बु, सुकळी (४८ पैसे), अंतरवाली खुर्द व शे, चेडेचांदगाव, मंगरूळ बु, मंगरूळ खुर्द, नागलवाडी, वाडगाव, वरखेड (४९ पैसे)