अधिवेशनात संधी मिळाल्यास मतदार संघाच्या प्रश्नांना वाचा फोडणार – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यापासून मागील तीन वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मतदार संघातील रखडलेल्या विकासाला चालना देवून मतदार संघातील बहुतांश विकास कामे मार्गी लावली आहेत. अजूनही मतदार संघाचे विकासाचे काही प्रश्न प्रलंबित असून संधी मिळाल्यास मतदार संघाच्या प्रश्नांना हिवाळी अधिवेशनात वाचा फोडणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे. 

 दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आ. आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे कि, निवडून येताच पहिल्याच अधिवेशनात पश्चिमेला वाहून जाणारे पाणी पूर्वेला अतितुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवावे याकडे सभागुहाचे लक्ष वेधले होते. निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जनतेला आश्वासित करून गोदावरी कालव्यांची दुरुस्ती, कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न, उपजिल्हा रुग्णालय, काकडी विमान तळाचा विकास, कार्गो सेवा, निळवंडे कालव्यांना निधी, मतदार संघातील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना, शासकीय इमारती नूतनीकरण, तीर्थक्षेत्र विकास, अल्पसंख्यांक विकास, मतदार संघातील रस्ते व पुलांचा विकास, उजनी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करणे, आय.टी.आय. इमारत नूतनीकरण, मतदार संघातील रस्त्यांचा विकास आदी महत्वाचे प्रश्न सोडवून इतरही महत्वाची विकास कामे सातत्याने पाठपुरावा करून पूर्ण करून घेतली आहे.

परंतु अजूनही मतदार संघातील प्रलंबित असलेले विकासाचे प्रश्न  यामध्ये स्वतंत्र क्रीडा संकुल, पोलीस वसाहत व ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत, बस स्थानक परिसरात व्यापारी संकुल,कोपरगाव शहरात भूमिगत गटारी व रस्ते विकास, कोपरगाव बस आगाराची बस संख्या वाढवावी, गावतळे व पाणी पुरवठा योजनांसाठी पाणी आरक्षित व्हावे, कृषी यांत्रिकीकरण अशा सर्वच शासकीय योजनांचा लक्षांक वाढून मिळावा, रेशन ऑनलाईन झालेले असूनही धान्य मिळत नाही त्यामुळे लक्षांक वाढवून मिळावा, समृद्धी महामार्ग इंटरचेंजच्या नावात शिर्डी बरोबरच कोपरगावचे नाव देण्यात यावे.

कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्ग पूर्ण करावा, पिक विमा धारक शेतकऱ्यांना पिक विम्याचा योग्य लाभ मिळावा, आदिवासी समाजासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी, मंजूर बंधारा दुरुस्तीसाठी निधीची तरतूद व्हावी, तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी मिळावा, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,०००/-  हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान तातडीने मिळावे असे मतदार संघाचे प्रश्न प्रलंबित असले तरी त्यासाठी पाठपुरावा सुरूच आहे. या प्रश्नांना तातडीने चालना मिळावी यासाठी सोमवार (दि.२०) पासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात संधी मिळाल्यास वाचा फोडणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.