स्व. राजळे, अहमदनगरची ओळख बदलण्याची क्षमता असलेला नेता – चिवटे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : संशोधक व अभ्यासूवृत्ती असलेला, प्रत्येक घटनेकडे वेगळ्या नजरेने पाहणारा, निर्भिड व राजकारण्यांना न शोभन्या इतका निर्मळ मनाचा, मित्रासाठी जीव टाकणारा जिवलग मित्र आणि अहमदनगरची ओळख बदलण्याची क्षमता असलेला नेता, गावकी पासून देश परदेशातील विविध विषयाचा चतुरश्र अभ्यास असलेल्या माजी आमदार स्वर्गीय राजाभाऊ राजळे यांचे बद्दल काँग्रेसच्या तत्कालिन प्रभारीने, ‘आप तो मुख्यमंत्री बनने की हैसियत रखते है’  असे काढलेले गौरवोद्गार अत्यंत समर्पक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी येथे केले.

      माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शेवगाव येथील राजीव राजळे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राजीव बुक फेस्ट २०२२ ‘ उपक्रमाचा शुभारंभ चिवटे यांचे हस्ते ज्येष्ठ साहित्यिक शरद तांदळे यांच्या प्रमख उपस्थितीत सोमवारी करण्यात आला. शेवगावचे भूमिपूत्र ज्येष्ठ उद्योजक मंदार भारदे अध्यक्षस्थानी होते.

      चिवटे म्हणाले, निर्णय घेतल्यानंतर त्याच्या परिणामाचा, यश अपयशाचा  विचार करु नये. निर्भीडपणे आपल्या निर्णयाचा पाठपुरावा केल्यास जीवनात यशस्वी होता येते. हे स्व. राजळेकडून शिकावे, राजाभाऊ राजळे मित्र मंडळाने आपल्या अश्रूंची ताकद बनवून त्यांचे विचार लोकांना चिरकाल प्रेरणा देतील या दृष्टीने काम करण्याची आवश्यकता  असल्याचे नमुद करून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील नव्या शासनाने, मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता कक्ष नव्याने विकसित केल्याची माहिती दिली.    

       या उपक्रमाद्वारे आतापर्यंत २ हजार ५०० शिबीरातून ६ लाख लोकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना १० कोटी रुपयावर किंमतीच्या औषधांचे वाटप करण्यात आले. २० हजार रुग्णांना शस्त्रक्रीयेसाठी वैद्यकीय अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यात साडेतीन हजार बालकांचाही समावेश आहे. या उपक्रमाचा लाभ मानवीय दृष्टिकोनातून थेट केरळ राज्यातही  देण्यात आला आहे. परिसरातील गरजूनी आमदार राजळे यांचे संपर्क कार्यालयासी अवश्य संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

ज्येष्ठ साहित्यिक तांदळे म्हणाले ,वाचनामुळे जीवन समृद्ध होते. व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. वाचन ज्ञानाचा श्रोत आहें. यश कोणाची मक्तेदारी नाही. अब्दुल कलाम, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय वाचा व समजून घ्या. यशाची पहिली पायरी वाचन आहे. आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर  युवा पिढीने वाचन संस्कृती जोपासणे आवश्यक आहे. माजी नगरसेवक महेश फलके मित्र मंडळांने ग्रामीण परिसरात वाचन संस्कृती अधिक समृद्ध व्हावी यासाठी स्व.राजीव राजळे यांच्या जयंती दिनानिमित्त प्रत्येक वर्षी पुस्तक प्रदर्शनाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले !

        कार्यक्रमाचे अध्यक्ष भारदे यांनी, पुस्तकापुढे आपली मान झुकली तर जगात मान उंचावते. वाचनाने आपला दृष्टिकोन बदलतो. जीवनातील सर्व प्रकारच्या आवाहनाचा मुकाबला  करण्याची ताकद वाचनातूनच प्राप्त होत असल्याने वाचन संस्कृती वाढवणे अत्यावश्यक असल्याचे सांगून पुस्तकाशिवाय घर नसावे, स्वर्गीय राजळे प्रचंड वाचनामुळे कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलत. याची आठवण करून देत, आजची मुले बिघडली नसून पालक बिघडल्याची मीस्किल टीकाही त्यांनी केली.

उपक्रमाचे संयोजक माजी नगरसेवक फलके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, भाजपा तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे,दिनेश लव्हाट, सुनील रासने, संदिप जावळे, दत्ता फुंदे, अमोल पालवे, हरीश भारदे, अमोल घोलप, वाय डी कोल्हे, महेश शेटे, अशोक आहुजा, अशुतोष डहाळे, राम केसभट, संभा काटे, किरण पवार, दिगंबर काथवटे, विजय नजन, अभिजीत लुनिया आदि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते, निलेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप खरड यांनी आभार मानले.