कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभर साजरा करण्यात आला. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती येथे सुद्धा हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवंगत वसंत गणेश फडके यांच्या स्मृती प्रित्यर्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्तीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गरज पडल्यास त्या विद्यार्थ्यांचा उपचार इथून पुढे मोफत करणार असल्याचे डॉक्टर अंजली फडके यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे दरवर्षी इयत्ता चौथीतून पाचवीत जाणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी जे प्रथम क्रमांक घेतील त्यांना रोख पारितोषिके व संपूर्ण शाळेतून एक आदर्श विद्यार्थी यालाही रोख बक्षीस देऊन दरवर्षी हे पुरस्कार देणार असल्याचे सांगितले. दिवंगत गणेश फडके यांनी या ठिकाणी बालवाडी सुरू केली होती, त्यासाठी त्यांनी जागाही मोफत दिली होती, त्या अंगणवाडीचे मोठ्या शाळेत रूपांतर झालेले पाहून मला खूप समाधान वाटले, असे शिरिष फडके यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. शाळेसाठी सदैव मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्योति पतसंस्थेचे संचालक वाल्मीक भास्कर होते तर सोसायटीचे चेअरमन चंद्रभान रोहोम, संजीवनी कारखान्याचे संचालक प्रदीप नवले, ग्रामपंचायत सदस्य रमेश भास्कर, प्रतिश वराडे, नंदाताई रोहोम शालेय व्यवस्थापनचे अध्यक्ष विवेक भास्कर, उपाध्यक्ष मनोज तांबे सदस्य सुनीता वाघ, सोनाली भिवसेन आदीसह माता पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
शाळेच्या सर्वांगीण विकासामध्ये सर्व पालकांचे ग्रामस्थांचे व नागरिकांचा सहभाग असल्यामुळे शाळेची गुणवत्ता टिकून आहे. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष वाल्मीक भास्कर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जयंत मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे उपाध्यापक सुकलाल महाजन यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेच्या उपाध्यापिका ज्योती टोरपे, उपाध्यापक महेंद्र विधाते, शालेय व्यवस्थापन समितीचे आजी-माजी सदस्य सर्वांनी प्रयत्न केले.