कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : राष्ट्र सेविका समितीच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रविवारी (२२ ऑक्टोबर) कोपरगाव शहरात शानदार व शिस्तबद्ध पथसंचलन करण्यात आले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी शहरातील छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथे या पथसंचलनात सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी राष्ट्र सेविका समितीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील सर्व १९ जिल्ह्यांतून रविवारी (२२ ऑक्टोबर) सकाळी आठ वाजता एकाच वेळी पथसंचलन करण्यात आले. उत्तर नगर जिल्हा राष्ट्र सेविका समितीच्या वतीने जिल्हा कार्यवाहिका नीता राशिनकर व तालुका कार्यवाहिका रत्नाताई पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातून अतिशय जोशपूर्ण वातावरणात शिस्तबद्ध पथसंचलन पार पडले.
दत्त बेकरी, डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यामंदिर, एस. जी. विद्यालय, श्रीराम मंदिर, छत्रपती संभाजी महाराज सर्कल, आठरे बंगला, तहसील कार्यालय, भाजी मंडई असा या पथसंचलनाचा मार्ग होता. पवित्र भगव्या ध्वजाच्या साक्षीने गणवेशात आणि पदवेशात घोषाच्या तालावर सेविकांनी एकमेकींच्या पावलांशी पावले जुळवत लयबद्ध पथसंचलन करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. एका तालात व एका लयीत पथसंचलन करीत ही रॅली छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथे पोहोचताच माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी या पथसंचलनात सहभागी झालेल्या सर्व सेविका माता-भगिनींचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशाली आढाव, माजी नगरसेविका शिल्पा रोहमारे, हर्षादा कांबळे, श्वेतांबरी राऊत, भाजपचे शहर सरचिटणीस जयेश बडवे, सचिन सावंत, महावीर दगडे, जयप्रकाश आव्हाड, संतोष साबळे, खालिक कुरेशी, अभिजीत भोपे, गणेश जावरे, सतीश नेटारे, वाल्मिक आवारे, नितीन नेटारे आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्नेहलता कोल्हे व भाजप पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.