पांडुरंगाचा महिमा किर्तनातून सांगणारे सातारकर बाबा हरपले – बिपीन कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : पंढरीच्या पांडुरंगाची वारी ही जगात श्रेष्ठ असुन त्याचा महिमा अत्यंत सोप्या भाषेत किर्तन शिकवणुकीतुन देणारे बाबा महाराज सातारकर उर्फ निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हरपले अशा शब्दांत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी श्रध्दांजली वाहिली, भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनीही शोक व्यक्त केला.

बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, वारकरी संप्रदाय हा जगात सर्वश्रेष्ठ आहे. जीवन जुळवून घेण्याची शिकवण वारी देत असते त्यात कुणीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ नसतो हेच नेमकेपणाने किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी तळागाळातील वारक-यांना सांगुन त्यातुन सातत्याने प्रबोधन केले. वारीचे किर्तनरत्न त्यांच्या निधनाने निखळुन पडले आहे.

स्व. बाबा महाराज सातारकर यांचे वडील उत्कृष्ट मृदुंगवादक होते. त्यांच्याकडुन मिळालेली शिकवण बाबा महाराज सातारकरांनी सर्व समाज बांधवांना देत अनेकांना शिक्षीत केले. बाबा महाराज सातारकर यांना अवघ्या वयाच्या १२ व्या वर्षी मुंबई आकाशवाणीवर गायन करण्याची संधी मिळाली होती. त्यांची सर्व किर्तने अध्यात्म शिकवणुकीचा अमुल्य ठेवा आहे.

चैतन्य अध्यात्म ज्ञान प्रसार आणि ज्ञानपीठ प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातुन त्यांनी लहान मुलांना सुस्कारीत करण्याचे मोठे काम अव्यहतपणे सुरू ठेवले आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज पालखीचा शतकोत्तर मान सातारकर घराण्याकडे आहे, त्यांच्या निधनाने अमोघ वाणीचा किर्तनकार हरपला, सर्व वारकरी बांधव शोकसागरात बुडाले आहेत असेही बिपीन कोल्हे शेवटी म्हणाले.