शेवगावमध्ये गोळीबार

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : येथील शेवगाव गेवराई मार्गावरील एका हॉटेल जवळ गोळीबार झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडल्याची वार्ता वाऱ्या सारखी पसरली होती. यावेळी या घटनेत नेमका गोळीबार कोणी केला, कोणावर केला, यातील आरोपी कोण याबाबत अधिक माहिती उपलब्ध नसल्याने पोलीस देखील संभ्रमावस्थेत होते. यासंदर्भत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. ताब्यात घेतलेल्या इसमाची पोलीस सखोल चौकशी करीत आहेत. पोलीस यंत्रणेकडून मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार या घटनेतील एका जखमीला नगर येथे उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या तो अत्यावस्थेत असल्याने त्याचा जबाब घेता आला नाही असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान त्याची प्रकृती खालावल्याने त्या जखमीला पुण्याला हलविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली.

 तर  दुसऱ्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सांगितले की, या घटनेतील अत्यावस्थेत असलेल्या इसमाचे नावं अर्जुन पवार असून त्याचा जखमी साथीदार राकेश राठोड हे दोघे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील आहेत. या घटनेशी संबंधित पुण्यातील दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे हे सुट्टीवर असल्याने पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील हे शेवगाव पोलिस ठाण्यात ठाण मांडून आहेत. या घटनेप्रकरणी
तालुक्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.