कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : महाविकास आघाडी सरकार असतांना आ.आशुतोष काळे यांनी तात्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील यांच्याकडून गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३०० कोटी निधी रुपये मंजूर करून घेतला आहे. त्यापैकी आजपर्यंत मंजूर झालेल्या गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांच्या नवीन कामांसाठी ७२ कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
त्यापैकी पहिल्या टप्यातील ३६ कोटीची कालव्यांच्या दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून उर्वरित कामांच्या निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध कराव्यात यासाठी आ. आशुतोष काळे यांचा पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची पाटबंधारे विभागाने दखल घेवून गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी २९.१७ कोटीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
ब्रिटीश काळात निर्मिती झालेल्या गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे १०० वर्षापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या गोदावरी कालव्यांची वहन क्षमता कमी होवून त्याचा परिणाम सिंचनावर व कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या विविध पाणी पुरवठा योजनांवर होत होता. गोदावरी कालव्यांची दुरावस्था झाल्यामुळे वारंवार कालवे फुटत होते व पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. वहन क्षमता कमी झाल्यामुळे सिंचनासाठी शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने आवर्तन मिळत नव्हते. पर्यायाने शेतीच्या उत्पन्नावर दुष्परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत होते त्यामुळे कालवे दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला होता.
त्याची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जनतेला गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी निवडून आल्यापासून गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करून महाविकास आघाडी सरकारकडून ३०० कोटीचा निधी मिळविला आहे. या निधीतून आजवर ३६ कोटीच्या निधीची कालव्यांच्या दुरुस्तीचे कामे सध्या प्रगतीपथावर असून कोपरगाव तालुक्यात देखील दुरुस्तीचे काम सुरु आहे.
उर्वरित कामांच्या निविदा देखील तातडीने प्रसिद्ध कराव्यात यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून पाटबंधारे विभागाने गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी २९.१७ कोटीच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. लवकरच या निविदांना मंजुरी मिळून डाव्या-उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीचे काम वेगाने होण्यास मदत होवून लाभधारक शेतकऱ्यांच्या व आवर्तनावर असणाऱ्या असंख्य पाणी पुरवठा योजनांना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.