विद्युत वाहक तार तुटून शॉक बसल्याने शेतमजूर व म्हैस जागेवर ठार

शेवगाव प्रतिनिधी, दि. १५  : तालुक्यातील एरंडगाव येथे विद्युत वाहक तार तुटून शॉक बसल्याने एक शेतमजूर व म्हैस जागेवर ठार झाली असून आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना काल  बुधवारी ( दि. १४ ) घडली असून
शेवगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

         या संदर्भात अधिक माहिती अशी की महादेव लक्ष्मण पूंड ( वय ५० ) रा. एरंडगाव हे शेतमजूर सकाळी साडेसातला  ऊसाच्या शेतात पाणी भरत होते. यावेळी गोठयातील म्हैस सुटून ऊसाच्या शेतात घुसली असता तेथे तूटलेल्या विद्युत वाहक तारेत अडकून कोसळली. म्हैस का पडली? म्हणून पहाण्यासाठी पुंड धावतच म्हशी जवळ गेले. तेव्हां त्यांनाही वीजेचा शॉक बसून तेही कोसळले. यावेळी काही अंतरावर असलेल्या भाऊसाहेब रतन बनकर ( वय ४२ ) यांनाही शॉक बसून ते लांब फेकले गेले.

        पुंड व बनकर यांना तातडीने शेवगाव येथील नित्यसेवा रुग्णालयात  हलविण्यात आले. मात्र तेथे पुंड हे अगोदरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर बनकर यांचे वर उपचार सुरू आहेत. शवविच्छेदनानंतर सायंकाळी उशिरा पुंड यांचे वर एरंडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेवगाव पोलीस ठाण्यात या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार बाबासाहेब शेळके तपास करीत आहेत.