सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : तालुक्यात पार पडणाऱ्या १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराने निवडणूक होणाऱ्या गावाचे राजकारण ढवळून निघाले असून सर्वत्र जाहीर प्रचारा ऐवजी उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटीवर प्रचाराचा भर दिला आहे.
          ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होत असल्याने गावचे सरपंच पद पटकावून गावच्या राजकारणावर आपले वर्चस्व राखण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सर्वच मंडळांच्या प्रमुखांनी तसेच तालुक्याच्या राजकारणातील प्रस्तापितांनी गाव पातळीवरील या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 

सध्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गावातील प्रत्येक प्रभाग पदयात्रा, कॉर्नर मिटिंग, बैठका व गाठीभेटीच्या  माध्यमातून पिंजून काढला. मतदारांनी संधी दिली तर गावच्या विकासासाठी आपल्या मंडळाच्या माध्यमातून कोणती कामे करणार याचाही लेखा जोखा मांडण्यावर सर्वानीच भर दिला असून आरोपप्रत्यारोपाच्या माध्यमातून गावचे राजकारण ढवळून निघाले आहे.

तालुक्यातील  दहीगावने, रांजणी, जोहरापूर, खामगाव, खानापूर, भायगाव, रावतळे कुरुड्गाव, अमरापूर, सुलतानपूर खुर्द, वाघोली, प्रभूवाडगाव व आखेगाव तिर्तफा अशा एकूण १२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ३८ उमेदवार तर ४० प्रभागातील १०८ जांगासाठी २५९ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात  आहेत.

        बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १३ हजार १५० पुरुष व १२ हजार ७ महिला असे एकूण  २५ हजार ५७  मतदार असून मतदानासाठी ४२  मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानासाठी सर्व मिळून  २७० अधिकारी कर्मचा-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून मतदान अधिकारी, कर्मचारी व साहित्य वाहून नेण्यासाठी ९ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली ६० पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड जवान यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.