दलित वस्ती विकास निधी इतरत्र वळविल्याची खोटी माहिती देऊन काळे गट तोंडघशी – जितेंद्र रणशूर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी मंजूर झालेला निधी इतर कामासाठी वळविता येत नाही. मुळात दलित वस्ती विकास निधी स्वतंत्र रीतीने नियमबद्ध पद्धतीने मंजूर होतो. त्याचा विनियोग दलित वस्ती विकासाव्यतिरिक्त इतरत्र करता येत नाही याची जाणीव व पुरेसा अभ्यास नसल्यामुळे काळे गट नेहमीप्रमाणे आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करण्यात यशस्वी झाला आहे.

वारंवार काळे गटच अपूर्ण माहिती देऊन दलित समाजबांधवांवर खरा अन्याय करतो आहे ही वस्तुस्थिती आहे, अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते जितेंद्र रणशूर यांनी केली आहे. तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी शासन निधी देतच असते. त्यामुळे तो निधी आपणच आणला असा खोटा कांगावा विद्यमान आमदारांनी करू नये, असा सल्लाही रणशूर यांनी दिला आहे.

कोपरगाव नगर परिषदेने दलित वस्तीमध्ये सुचविलेली कामे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी रद्द करून दलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी दुसऱ्या प्रभागात वळवल्याचा आरोप धादांत खोटा व निराधार आहे. दलित वस्ती विकास निधी हा केवळ दलित वस्तीतच वापरता येतो एवढे साधे ज्ञान समाजाला नाही, असा गैरसमज अफवा पसरवणाऱ्यांचा असावा. मात्र, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा मूलमंत्र देऊन समाजाला खऱ्या-खोट्याची पारख करायला शिकवले आहे.

समाज कुठलाही असो, मूलभूत सुविधा हा नागरिकांचा हक्क आहे. विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी कोणतेही ठोस काम गेल्या साडेतीन वर्षांत केले नाही. जनतेसमोर स्वत:चे योगदान ठेवण्यासाठी काहीच सांगण्यासारखे नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते उठसूठ कोल्हे कुटुंबावर टीका करून आ. काळेंची निष्क्रियता झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असे जितेंद्र रणशूर यांनी म्हटले आहे. 

दलित वस्ती विकास निधी मंजूर करण्यासाठी त्यासंदर्भातील ठराव, मुख्याधिकाऱ्यांचे पत्र, तांत्रिक प्रक्रिया यासह इतर अनेक सोपस्कार पार पाडावे लागतात. त्यामुळे दलित वस्ती विकासासाठी असलेला निधी दुसरीकडे वापरला जाईल, असे म्हणणे हास्यास्पद आहे. त्या भागातील नागरिकांच्या सुखसुविधेसाठी कामांचा प्राधान्य क्रम ठरवून प्रशासन निधीचा विनियोग करत असते. मन म्हणेल तेच सत्य व वाटेल तोच कायदा या अपूर्ण ज्ञानावर आपले राजकीय हित साधण्यासाठी आमच्या दलित बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मतांचा निशाणा साधणे ही राष्ट्रवादीची कायमची सवय समाजाला ठाऊक आहे. त्यामुळे कोल्हे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून काळे गटाला काहीही साध्य होणार नाही.

दलित वस्ती विकास निधी वळवल्याच्या वावड्या पसरवणाऱ्यांनी पूर्ण माहिती घेतल्यास कोल्हे यांनी अधिकचा निधी मिळवण्यासाठी पालकमंत्री व शासनाकडे मागणी करून तो शहरासाठी प्राप्त करून घेतला असल्याचे सत्य समोर येऊन विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याशिवाय राहणार नाही. नागरी दलित वस्ती सुधारणा योजना महाराष्ट्रात राबवली जाते. जिल्हा स्तरीय संनियंत्रण व अंमलबजावणीकरिता मार्गदर्शक तत्त्वे या योजनेसाठी विहित करण्यात आलेली आहेत. याचा पुरेसा अभ्यास करावा आणि मगच बातम्या पेराव्या, असा सल्ला जितेंद्र रणशूर यांनी दिला आहे. 

आज दलित वस्ती विकासावर बोलणाऱ्यांनी माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या कार्यकाळात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी दलित वस्तीतील विकासकामांना प्राधान्य देण्यात आले. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या विधानसभा सदस्य काळात मतदारसंघातील दलित वस्तीत मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यामुळे रस्ते, गटारी, समाजमंदिर, पेव्हर ब्लॉक आणि मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊन दलित बांधवांच्या मागण्यांची पूर्तता झाली. याची सल म्हणून की काय, कोल्हे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून राजकीय पोळी भाजू पाहणारे नियमांचा अभ्यास न केल्यामुळे तोंडघशी पडले आहेत, असा टोलाही जितेंद्र रणशूर यांनी लगावला आहे.