चासनळी घटनेतील डॉक्टरवर कठोर कारवाई करावी, संजीवनी युवा प्रतिष्ठान मागणी

Mypage

आपत्कालीन परिस्थितीत संजीवनी युवा प्रतिष्ठानशी संपर्क साधा – सिद्धार्थ साठे यांनी

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० : कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीच्या वेळी डॉक्टर हजर नसल्यामुळे एका विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली. संजीवनी युवा प्रतिष्ठानने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, सदर घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित डॉक्टरवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी संजीवनी युवा प्रतिष्ठानने तहसिलदार संदीप भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Mypage

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी (९ ऑगस्ट) सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार संदीप भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, पंकज कुऱ्हे, सागर राऊत, स्वराज सूर्यवंशी, भैय्या नागरे, वैभव सोळसे, समाधान कुऱ्हे, साहिल जाधव, कुणाल आमले, वासुदेव शिंदे, सुमित खरात, बाळासाहेब पानगव्हाणे, बापू गाडे, योगेश वाघ, रितेश परजणे आदी उपस्थित होते.

Mypage

तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यातील मौजे, चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कार्यपद्धतीचा या भागातील नागरिकांना मोठा फटका बसत आहे.

Mypage

या प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. हे प्राथमिक आरोग्य केंद्र गरोदर महिला आणि निष्पाप बालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. या आरोग्य केंद्रात एक गरोदर विवाहित महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. सदर महिलेच्या प्रसूतीवेळी आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर उपस्थित नसल्याने, त्या महिलेला हकनाक आपले प्राण गमवावे लागले. ही घटना केवळ संताप व्यक्त करून विसरण्यासारखी नाही तर आरोग्य विभागासाठी अत्यंत लाजीरवाणी आहे.

Mypage

सदर महिला प्रसूतीसाठी चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली असताना, संबंधित वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तेथे हजर राहून त्या महिलेच्या उपचाराबाबत योग्य काळजी घेणे आवश्यक होते; पण दुर्दैवाने तसे घडले नाही. सदर महिलेच्या प्रसूतीच्या वेळी संबंधित वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रामध्ये उपस्थित नव्हते. त्यामुळे सदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर तातडीने कठोर कारवाई व्हावी. ज्यामुळे यापुढील काळात संपूर्ण आरोग्य यंत्रणेला आपल्या कर्तव्याप्रती जबाबदारीचे भान येईल व अशा घटना परत घडणार नाहीत.

Mypage

चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक रुग्णवाहिका देण्यात आलेली आहे; परंतु एखाद्या रुग्णाला तातडीने अधिक उपचारासाठी दुसऱ्या ठिकाणी रुग्णालयात न्यायचे म्हटले तर या रुग्णवाहिकेसाठी डिझेल उपलब्ध नसते. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी रुग्णावर वैद्यकीय उपचार करण्याकडे दुर्लक्ष करतात.

Mypage

या आरोग्य केंद्रात प्रसूतीच्या वेळी डॉक्टर हजर नसल्यामुळे व वेळेवर उपचार न मिळाल्याने एका विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. दिवंगत महिलेच्या बालकाचे भवितव्य मातेअभावी अंध:कारमय बनले असून, कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अशा बेजबाबदार डॉक्टरवर तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

Mypage

अशाच अनेक घटना यापूर्वीदेखील कोपरगाव तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयात घडल्या आहेत. आरोग्य विभागाचा गलथानपणा, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष यामुळे असे प्रकार घडत असून, ही बाब चिंताजनक आहे. अनेक जबाबदार डॉक्टर हे सामाजिक भान ठेवून अहोरात्र सेवा देत असतात. त्यांचा आदर्श अशा निष्काळजी डॉक्टरांनी व बेजबाबदार अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे, असेही या निवेदनात नमूद केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत संजीवनी युवा प्रतिष्ठानशी संपर्क साधा. संजीवनी युवा प्रतिष्ठान हे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अविरत सेवाकार्य करत असून, आपत्कालीन परिस्थितीत व संकटकाळात जर कुणाला वैद्यकीय उपचार किंवा इतर प्रकारची मदत हवी असेल तर त्यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या हेल्पलाईन नंबर ८१८१९०९०९० वर संपर्क साधावा, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक सिद्धार्थ साठे यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *