कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातृभूमी तसेच वीर जवानबद्दल असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी, माझी माती माझा देश हे आवाहन तमाम भारतवासीयांसाठी अलीकडेच केले होते, त्याला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अभ्यासू युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, तत्कालीन प्रथम महिला आमदार स्नेहललता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिसाद देत सर्व कामगारांनी तशी पंचप्रण शपथ क्रांतीदिनास घेतली आहे.
याबाबतची माहिती अशी की, देशातील शहीद वीर जवानांना नमन करण्यासाठी व त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी भारत देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त माझी माती माझा देश अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करून तळागाळातील जनता जनार्दनापर्यंत हा संदेश देत त्याची सुरुवात क्रांती दिनापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व सर्व मंत्री महोदयांनी केली, त्याचबरोबर साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना याबाबत परिपत्रक काढून आवाहन केले होते.
त्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या सर्व कामगारांनी सहभाग देत त्याची सुरुवात केली. कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना याची शपथ देत अमृत महोत्सवी स्वातंत्र्याच्या यशोगाथेबाबत माहिती दिली.
यावेळी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, मानव संसाधन विकास विभागाचे अधिकारी प्रदीप गुरव, मुख्यलेखापाल एस.एन. पवार, ऊस व्यवस्थापक गोरखनाथ शिंदे, मुख्य रसायन तज्ञ विवेककुमार शुक्ला यांच्यासह विविध विभागाचे खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने यांनी आभार मानले.