ऊस उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचन एकमेव पर्याय – अरुण देशमुख

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : ऊस पिकाला त्याच्या गरजेनुसार पाणी देणे आवश्यक आहे. त्यासाठी ठिबक जलसिंचनाचा वापर फायद्याचा ठरतो आहे. त्यासाठी शेतकऱ्यानी जास्तीत जास्त ठिबक जलसिंचनाचा वापर करावा असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेचे माजी तंत्रज्ञान शास्त्रज्ञ, ऊस तज्ञ व नेटाफिम कंपनी कृषी विद्या विभागाचे प्रमुख उपसरव्यवस्थापक अरुण देशमुख यांनी केले.

ऊस उत्पादनात सातत्याने होत असलेली घट व ऊस वाढीसाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळावे. यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळ व संवत्सर येथे आयोजित मेळाव्यात उपसरव्यवस्थापक अरुण देशमुख बोलत होते.

पुढे बोलतांना अरुण देशमुख म्हणाले की, ऊस उत्पादन वाढीसाठी रासायनिक खताबरोबरच जमिनीचा सेंद्रीय कर्ब वाढविणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस जमिनीचा सामु व क्षारता वाढत आहे. त्यामुळे उत्पादकता कमी झाली असून, ऊस पिकाला उत्पादन वाढविणेसाठी ठिबक सिंचनाचा वापर फायद्याचा आहे. कमी पाण्यात अधिकचे उत्पादन मिळविण्यासाठी खत मात्राचा बचतीसाठी ठिबक शेती खात्रीचा मार्ग असुन त्यांचा अवलंब करावा.

कर्मवीर शंकरराव काळे यांच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले की, कर्मवीर भाऊराव यांनी रयत शिक्षण संस्थेच जे छोटेसे रोपटे लावले त्याचा वटवृक्ष करण्याचे काम कर्मवीर शंकरराव काळे यांनी केले असल्याचे सांगत ते नेहमी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काळजी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तीच परंपरा जेष्ठ संचालक, माजी आमदार अशोकराव काळे व कोपरगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आशुतोष काळे यांनी पुढे सुरु ठेवून कारखाना कार्यक्षेत्रात ऊस वाढीसाठी सातत्याने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करत असतात.

शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यातून शेतकऱ्यांना आपले ऊसाचे पिक कसे टिकवायचे यासाठी सर्व ऊस उत्पादक सभासदांना गटवार जनजागृती करुन त्याबाबत शास्त्रोक्त मार्गदर्शन करीत आहे.ठिबक सिंचनाची सुरवात हि इस्त्रायल सारख्या देशात झाली. पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष असणाऱ्या इस्त्रायल देशाने कृषी क्षेत्रात सर्वात मोठी भरारी घेतली आहे. त्याचे महत्वाचे कारण आहे. पाण्याचा काटकसरीने केलेला वापर आपल्या देशात सुध्दा इस्राईल तंत्रज्ञाना वापरने गरजेचे आहे.

पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता नसुन पाणी मापात आणि वेळेत देणे गरजेचे आहे. आपल्या देशात दर दोन वर्षाने अवर्षण परिस्थिती निर्माण होणे नित्याचे झाले आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमतेने वापर ठिबक व स्प्रिंकलरद्वारे होईल. जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकविण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर होणे गरजेचे आहे. ऊस पिकास वेळोवेळी व प्रमाणशीर पद्धतीने रासायनिक व जैविक खते सुध्दा ठिबक सिंचनाने शक्य होते.

ऊस शेती जगवायची असेल तर ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही. या शेतकरी मेळाव्यात जय गुरुदेव इरिगेशन प्रतिनिधी भाऊसाहेब मोरे व त्यांच्या सहकारी यांनी नेटाफिम कंपनीनेचे ठिबक संचाची माहिती करुन दिली तसेच शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पध्दतीने पाण्याच्या बचतीचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक देखील करून दाखविले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी कारखान्यात चालु असलेला, आधुनिक तंत्रज्ञान बदलाबाबत शेतकऱ्यांना माहिती करुन दिली. तसेच शेतकऱ्यांनी कारखाना नर्सरीत तयार होणारे पायाभुत ऊस बियाण्याचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन केले आहे. कारखान्याचे ऊस विकास अधिकारी कैलास कापसे यांनी कारखान्याचे ऊस विकास योजनांची माहिती देवून कारखाना राबवित असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली.

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष गोवर्धन परजणे, कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम, सूर्यभान कोळपे, अनिल कदम, श्रीराम राजेभोसले, शिवाजीराव घुले, सुनील माळी, शंकरराव चव्हाण, श्रावण आसने, सुरेश जाधव, माजी संचालक बाळासाहेब बारहाते, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे.

प्रगतीशील शेतकरी विजयराव जाधव, चंद्रशेखर देशमुख, राजेंद्र खिलारी, शिरीष लोहकणे, नारायण होन, व कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संतोष शिरसाठ, शेतकी अधिकारी कैलास कापसे आदी मान्यवरांसह व ऊस उत्पादक सभासद शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे यांनी आभार मानले.