नागरिकांना एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनांची माहिती

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : शिर्डी येथे दि.१७ ऑगस्टला शासन आपल्या दारी योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी आमदार मोनिकाताई राजळे यांनी पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठकीत तालुका प्रशासनाने केलेल्या नियोजनाबाबत माहिती घेऊन मार्गदर्शन केले.

या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे तसेच खासदार डॉ. सुजय विखे, आमदार, सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्याने, प्रशासनासह शासन सतर्क झाले आहे. या दिमाखदार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्वांनीच कंबर कसली असून, आमदार राजळे यांनी त्यामध्ये कोणती ही तृटी राहू नये म्हणून ही तीसरी बैठक घेतली आहे.

यावेळी आ. राजळे म्हणाल्या, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी आपले सरकार काम करत असून, या सरकारच्या काळात आपण जनहिता करिता अत्यंत वेगवान निर्णय घेत आहोत. नागरिकांना एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनांची माहिती व त्या योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. कमीत कमी कागदपत्रात, शासकीय निर्धारित शुल्कात तसेच जलद मंजुरी दिली जावी, याकरिता मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभिकरण राबविण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

याचाच एक भाग म्हणून, लोककल्याण या ध्येय ठेवून शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत शासकीय योजनाचा लाभ सुलभतेने पोहोचवावा याकरिता शासन आपल्या दारी या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पहिल्यांदाच सर्व सरकारी अधिकारी कर्मचारी व स्वयंसेवक नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देत योजनांची माहिती देणे, योजनेचे अर्ज भरून घेणे आणि योजनांचा लाभ देत सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न असून, पात्र ठरलेल्या योजनेचा लाभ घेता यावा व शासनाच्या इतर विभागाच्या योजनांचीही माहिती घेऊन, अर्ज करता यावा म्हणून या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तेथे शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी एकाच ठिकाणी एका छताखाली केवळ शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी उपस्थित रहाणार आहेत. तरी या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून राज्य सरकारच्या माध्यमातून योजित या योजनेच्या उत्सवाचा लाभ घ्यावा. असे आवाहन करून लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या लाभाच्या योजना कोणी दिल्या हे त्यांना समजावे, हे त्यांना अवगत करण्यावर भर आहे. निवड करण्यात आलेल्या व्यक्ती कोणत्याही राजकीय संबंधातून निवडलेल्या नसून तलाठी, ग्रामसेवक व कृषी विभागाने त्यांची निवड केली आहे

तहसिलदार प्रशांत सांगडे म्हणाले, शासनाच्या विविध योजनांपैकी लाभ घेतलेल्या लाभार्थी मधून तालुक्यातील ११३ गावातून एकूण एक हजार ८१५ स्त्री-पुरुष लाभार्थींची निवड करण्यात आली असून, त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन शासनाची निमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे. गट विकास अधिकारी राजेश कदम यांनी लाभार्थ्यांना शिर्डीला नेण्या-आणण्यासाठी शेवगाव आगारातून ३० तर संभाजीनगर आगारातून दहा अशा ४० बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची तसेच प्रत्येक बस मध्ये ४५ लाभार्थी व त्यांचे सोबत दोन समन्वयकाची तर पाच बसेस मागे एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, सर्वांच्या चहा, पाणी, नाष्टा व जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली.

यावेळी परिविक्षाधीन तहसिलदार राहुल गुरव, नायब तहसिलदार रवींद्र सानप,  सहाय्यक गट विकास अधिकारी दीप्ती गट, डॉ. संकल्प लोणकर,  प्र. उपअभियंता रामकिसन सरोदे, ता. कृषी अधिकारी अंकूश टकले, कृ. अ. राहूल कदम भाजपा तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे, शिवसेना ( शिंदे गट) जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भागवत, यांचेसह तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याण मुटकुळे यांनी सुत्रसंचलन केले.