बालम टाकळी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी माणिकराव शिंदे, उपाध्यक्ष पदी विश्वंभर गरुड

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०६ : तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय व आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या, बालमटाकळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी माणिकराव ताबाजी शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी विश्वंभर नागोराव गरुड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्रराजे घाडगे व उपाध्यक्ष रतनराव देशमुख यांनी रोटेशनप्रमाणे राजीनामे दिल्याने, रिक्त झालेल्या जागेवर निवडीसाठी संस्थेच्या कार्यालयात शनिवारी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष पदासाठी माणिकराव शिंदे तर उपाध्यक्ष पदासाठी विश्वंभर गरुड यांचेच अर्ज आल्याने, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी व्ही. के मुटकुळे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

अध्यक्षपदासाठी शिंदे यांच्या नावाची सूचना रामनाथ राजपुरे यांनी केली. त्यास अरुण बामदले यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्ष पदासाठी विश्वंभर गरुड यांच्या नावाची सूचना उमेश घाडगे यांनी केली. त्यास रोहिदास भोसले यांनी अनुमोदन दिले. संस्थेच्या स्थापने पासून ही संस्था लोकनेते स्व. मारुतराव घुले यांचे नेतृत्व मानणारी असून, सध्या माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.