कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : सन २०२३-२४ च्या रब्बी हंगामात जलसंपदा विभागाकडून गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला सिंचनासाठी आवर्तन सोडण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने गोदावरी डावा व उजवा कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांकडून नमुना नंबर ७ पाणी मागणी अर्ज मागविले आहेत.
लाभधारक शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत दाखल करायचे असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पाणी मागणी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन मा.आ.स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे. कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघ हा अवर्षणप्रवण असल्याने या भागात पर्जन्यमान कमी असते.
यंदा पावसाळ्यात कोपरगाव मतदारसंघात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, तूर, मूग आदी पिके पाण्याअभावी करपून गेली. खरीप हंगाम हातातून गेल्याने शेतकरी संकटात आहेत. कोपरगाव मतदारसंघाला दारणा धरणातून गोदावरी डावा व उजवा कालव्याद्वारे पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा होतो.
गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याच्या आवर्तनाचे ‘हेड टू टेल’ पर्यंत सर्व लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी आवर्तनाचे व्यवस्थित नियोजन करावे. कालवा तसेच चाऱ्या व पोटचाऱ्यांची दुरुस्ती तात्काळ करावी, अशा सूचना स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
गोदावरी कालव्याच्या पाण्यावरच या भागातील बहुसंख्य शेतकरी पिके घेतात. यंदा पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्याने आता शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावरच आहे. अहमदनगर येथे १६ नोव्हेंबरला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पाटपाण्यासंबंधी शेतकऱ्यांच्या भावना मांडत पाटपाण्याच्या आवर्तनांचे नियोजन काटेकोर करण्याची मागणी लावून धरली होती.
त्यानुसार रब्बीसाठी दोन आवर्तन सोडण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे. रब्बीच्या शिल्लक पाण्यातून उन्हाळी हंगामासाठी आवर्तन वाढून मिळावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केलेली आहे. जलसंपदा विभागाकडून मोठ्या व मध्यम प्रकल्पांचे सन २०२३-२४ च्या रब्बी हंगामासाठी सिंचनाचे मागणी क्षेत्र निश्चित करून आवर्तनाचे (रोटेशन) नियोजन करण्यात येणार आहे.
त्यासाठी रब्बी हंगामासाठी प्रवाही व उपसा सिंचनाने पाणी घेऊ इच्छिणाऱ्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील लाभधारक शेतकऱ्यांकडून नमुना नंबर ७ पाणी मागणी अर्ज मागविण्यात आले आहेत. तसे जाहीर प्रगटन नाशिक पाटबंधारे विभागाने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार लाभधारक शेतकऱ्यांनी सिंचनासाठी नमुना नं. ७ चे पाणी मागणी अर्ज येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात दाखल करून रीतसर पोहोच घ्यावी, असे आवाहन स्नेहलता कोल्हे यांनी लाभधारक शेतकऱ्यांना केले आहे.
गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात आधीच पाण्याचा दुष्काळ आहे. शासनाच्या धोरणानुसार धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन बिगरसिंचन व सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. मुदतीच्या आत ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल केले नाही. तर लाभधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
त्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांनी रब्बीसाठी पाणी मिळावे म्हणून तातडीने नमुना नंबर ७ चे मागणी अर्ज संबंधितांकडे दाखल करावेत. शेतकऱ्यांनी शेतीसाठी काटकसरीने पाणी वापरावे. सूक्ष्म सिंचनावर भर द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.