शेवगाव, बोधेगाव येथे मनोज जरांगे यांच्या सभेची जोरदार तयारी

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ :  मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे याच्या शेवगाव शहरात साई लॉन्स मंगल कार्यालयात गुरुवारी दुपारी एक वाजता व त्यानंतर तालुक्यातील बोधेगाव येथे जुन्या बाजार तळावर दुपारी तीन वाजता जाहीर सभा होणार असून तालुक्यातील दोन्ही ठिकाणी त्यांच्या महाविराट सभेची जय्यत तयारी झाली आहे.  

मनोज जरांगे तालुक्यात प्रथमच येत असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असून तालुक्यातील सकल मराठा समाजाचे हजारावर कार्यकर्ते सभांच्या नियोजनार्थ अहोरात्र कार्यरत आहेत. सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चरित्रपर तसेच मराठा आरक्षण जनजागृतीपर सुश्राव्य गायनांच्या  कार्यक्रमाने या महाविराट सभेचा प्रारंभ होणार आहे.

त्यानंतर जरांगे पाटलाच्या आगमनापर्यंत सकल मराठा समाज आरक्षणाचे गाढे अभ्यासक, योगेश केदार व प्रदीप सोळंकी यांची अभ्यासपूर्ण व्याख्याने होणार आहेत. जरांगे पाटील हे तालुक्यातील भातकुडगाव फाट्यावर आल्या नंतर त्याठिकाणी परिसराच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात येऊन मोटर सायकलच्या रॅली सह त्यांचे शेवगावात आगमन होणार आहे.

क्रान्ती चौक व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांचे भव्य स्वागत होईल. तेथून साई लॉन्स सभास्थाना पर्यंत रस्याच्या दुतर्फा जेसीबी द्वारे त्यांचेवर पुष्प वृष्टी करण्यात येणार आहे. सभेची दुपारची वेळ असल्याने सभास्थानी मोठा मंडप उभारण्यात आला आहे.

व्यासपिठावरील जरांगे पाटील स्पष्ट दिसावेत व त्यांना स्पष्ट पणे ऐकता यावे म्हणून सहा बाजूस एलईडी वॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. लॉन्सच्या दोन भव्य सभा मंडपात महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. उपस्थितासाठी अरोचे शुद्ध थंडगार पिण्याच्या पाण्याचे टँकर व जारचे नियोजन करण्यात आले असून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

पाथर्डी व तीसगांव मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी वैशंपायन नगर मधील श्री दत देवस्थाना जवळील आठ एकर जागेत तसेच नेवासे व पैठण मार्गे शेवगाव शहरातून येणाऱ्या वाहनांसाठी साई लॉन्स समोरच्या पाच एकर जागेत वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे. सभांना येणाऱ्याना कुठलीही अडचण भासू नये. म्हणून विविध समित्यातील हजाराच्यावर स्वयसेवक सहकार्यासाठी तत्पर आहेत. शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विलास पुजारी यांनी पोलिसांची कुमक वाढवून सर्वत्र चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे.

कार्यक्रमाला किंचीतही गालबोट लागू नये यासाठी सर्व सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जपावे. ज्येष्ठ वृद्धांची व भगिनींची काळजी घ्यावी. दोन्ही सभांना मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी. संयोजन समिती, शेवगाव