कोपरगाव रेल्वेस्थानक पुनर्विकासासाठी २९.९४ कोटी रुपये मंजूर – स्नेहललता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन करून, भारतीय रेल्वेच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत कोपरगाव रेल्वेस्थानकाचा समावेश करून स्थानकाच्या पुनर्विकासासाठी २९ कोटी ९४ लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल भाजपा नेत्या स्नेहललता कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व दर्शना जरदोश यांचे मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीने आभार मानले.

कोपरगाव रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासामुळे रेल्वेस्थानकाचा कायापालट होऊन प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत २५ हजार कोटी रुपये खर्चून कोपरगावसह देशभरातील ५०८ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार असून त्यात कोपरगाव स्थानकाचा समावेश केला. याबद्दल स्नेहललता कोल्हे यांनी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्री महोदयांना धन्यवाद दिले.

या विविध विकासकामांची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (६ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कोपरगाव रेल्वेस्थानक येथे करण्यात आले. त्यावेळी स्नेहललता कोल्हे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर खा. सदाशिव लोखंडे, आ. आशुतोष काळे, मध्य रेल्वेचे सोलापूर विभागाचे वरिष्ठ अभियंता मोहम्मद फैज, भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, रवींद्र पाठक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, बाबासाहेब पवार, महिला आघाडीप्रमुख विमलताई पुंडे, कोपरगाव रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापक बी.एस. प्रसाद आदी उपस्थित होते.

याप्रसंगी स्नेहललता कोल्हे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने मागील नऊ वर्षांत जनतेच्या हिताला प्राधान्य देत अनेक विकासकामे केलेली आहेत. विकसित भारताचे उद्दिष्ट ठेवून मोदी सरकार काम करत आहे. कोपरगाव रेल्वेस्थानक हे शिर्डी येथील जागतिक ख्यातीच्या, श्री साईबाबा देवस्थानला भेट देण्यासाठी येणाऱ्या देश-विदेशातील साईभक्तांच्या दृष्टीने केंद्रस्थानी आहे.

कोपरगाव रेल्वेस्थानकावर साईभक्त व प्रवाशांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून अनेक छोटी-मोठी कामे मार्गी लागली आहेत. यापूर्वी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव ते कान्हेगाव या १६ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण २८ जानेवारी २०२३ ला पूर्ण झाले. तसेच प्रवाशांसाठी रेल्वे स्टेशनवर लिप्टची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गुडस सायडिंगचे नूतनीकरण, गुड सायडिंगशेजारी नागरिकांसाठी कायमस्वरूपी रोडचे नूतनीकरण, वातानुकुलित प्रतीक्षा कक्ष, नवीन प्रवेशद्वार आणि रेल्वे स्टेशन परिसराचे सुशोभिकरण, याशिवाय साईभक्तांसाठी भक्तनिवास आणि टॅक्सी काउंटर आदी कामे करण्याची मागणी केलेली होती.

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या २९.९४ कोटी रुपये निधीतून कोपरगाव रेल्वेस्थानकाचा विकास व सुशोभिकरण होणार आहे. यामध्ये रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ता, पार्किंग, पादचारी मार्ग, संरक्षण भिंत, प्रवेशदवार, स्वच्छतागृह, निवासस्थाने, स्टेशन इमारतीचे नूतनीकरण, ओव्हर ब्रिज रॅम्प अशा अनेक कामांचा समावेश आहे. यामुळे निश्चितच रेल्वे प्रवाशांची सोय होणार आहे. अशा विविध विकासकामांमुळे कोपरगाव रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार असून, या परिसराच्या वैभवात भर पडणार आहे.

यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक बाळासाहेब वक्ते, बापूसाहेब बाराहाते, ज्ञानेश्वर परजणे, रमेश गवळी, शिंगणापूरचे सरपंच डॉ. विजय काळे, माजी सरपंच भीमा संवत्सरकर, राजेंद्र लोणारी, ल‌क्ष्मीकांत संवत्सरकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, संजय सातभाई, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, पीपल्स बँकेचे अध्यक्ष कैलासशेठ ठोळे, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले, संचालक राजेंद्र बागुल, भाजयुमो शहराध्यक्ष अविनाश पाठक, मुकुंदमामा काळे, शिवाजीराव जाधव, प्रसाद आढाव,

संजय तुळसकर, राजेंद्र रूपनर, बाळासाहेब रूपनर, जालिंदर आढाव, बाळासाहेब वाघ, मनोज इंगळे, सतीश निकम, अंकुश कुऱ्हे, नितीन कुऱ्हे, मंगेश गायकवाड, गणेश राऊत, दत्तू संवत्सरकर, प्रशांत आढाव आदींसह संजीवनी उद्योग समूहाचे पदाधिकारी, स्थानिक रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य,

रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी, शिंगणापूर ग्रामपंचायतचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांचे भाषण झाले. स्वागत व प्रास्ताविक सोलापूर विभागाचे वरिष्ठ अभियंता मोहम्मद फैज यांनी केले. यावेळी शिंगणापूर जि.प. प्राथमिक शाळा व संजीवनी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते व समूह नृत्य सादर केले.

कोपरगाव रेल्वेस्थानक ज्या शिंगणापूर परिसरात आहे, त्या शिंगणापूर गावच्या विकासासाठी माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेबांनी अथक प्रयत्न केले. त्यांनी व कोल्हे कुटुबीयांनी कायमच या गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतलेला आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत कोपरगाव रेल्वेस्थानकाचा विकास होतोय.

आगामी काळात विस्तारित विकास कामांमुळे शिंगणापूर ग्रामस्थांपुढे रेल्वे कार्यक्षेत्रातील रस्ते आणि दळणवळणाचे काही भविष्यकालीन निर्माण होणारे प्रश्न सोडवण्यासाठी स्नेहललता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिंगणापूर ग्रामस्थांच्या वतीने मध्य रेल्वेचे सोलापूर विभागाचे वरिष्ठ अभियंता मोहम्मद फैज यांना निवेदन देण्यात आले. याबद्दल स्नेहललता कोल्हे यांचे शिंगणापूर ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.