संवत्सर येथील जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली ग्रहांची स्थिती

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूलमध्ये पोलाद कंपनी लिमिटेड व वस्तू स्टील कोपरगांव यांच्या संयुक्त सहकार्याने तारांगण खगोलशास्त्र याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सौरमंडळातील तारे, सूर्य, चंद्र, उल्का, आकाशगंगा, ग्रहांची स्थिती व त्यांचे नियम याबाबतच्या चित्रफीतीमधून प्रत्यक्ष अनुभव घेता आल्याने विद्यार्थी भारावून गेले.

या कार्यक्रमासाठी शाळेच्या स्कूल कमेटीचे सदस्य राजेश परजणे पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर साबळे, उपसरपंच विवेक परजणे, वस्तू स्टीलचे व्यवस्थापक किशोर विभुते, तारांगणचे मार्केटींग ऑफीसर अजय कुलकर्णी, सिस्टीम ऑपरेटर अभिषेक ढवळे, सहाय्यक ऑपरेटर प्रशांत पंडीत, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे, सोमनाथ निरगुडे, शिवाजीराव गायकवाड यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते.

प्रारंभी मृख्याध्यापक रमेश मोरे यांनी स्वागत केले तर शिक्षक भगवान शिंदे यांनी प्रास्ताविक केले. मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शाळेच्यावतीने राजेश परजणे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

खगोलशास्त्र हे जगातील सर्वात जुने व प्रभावशाली असे शास्त्र आहे. या शास्त्रात पृथ्वीच्या अंतरंगातील खनिज, लाव्हा यांच्यासह पृष्ठभागावरील नद्या, पर्वत, सजीवसृष्टी, सूर्य, चंद्र, आकाशगंगा, उल्का, ग्रहांची स्थिती त्यांचे नियम, निसर्ग, इतिहास व भविष्यातील त्यांच्या हालचाली या सर्वच घटकांचा या खगोलशास्त्राद्वारे अभ्यास केला जातो. एकेकाळी भौतिकशास्त्राची महत्वाची शाखा असलेले खगोलशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून जगाच्यासमोर आले आहे.

या क्षेत्रात खगोलशास्त्रज्ञांची मागणी दिवसेंदिवस वाढत असून ज्या युवकांना अवकाशातील रहस्ये जाणून घेण्याची आणि त्यात करियर घडवायची इच्छा असेल त्यांच्यासाठी यात भरपूर संधी आहे. या क्षेत्रात करियर करायचे असेल तर विज्ञान विषयातून बारावी व भौतिकशास्त्रातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. प्रामुख्याने भौतिकशास्त्रात रुची असणे आवश्यक आहे. खगोलशास्त्र हे एक व्यापक असे क्षेत्र आहे. त्याच्या विविध शाखा देखील आहेत. युवकांना त्यांच्या आवडीनुसार शाखा निवडता येतात. विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास करून करियर घडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे आवाहन यावेळी राजेश परजणे पाटील यांनी केले.

याप्रसंगी पर्यवेक्षक शरद आंबिलवादे, शिक्षक सुनील वाघमारे, शरीफ शेख, मुरलीधर भोये, अनिल बनसोडे, गणेश आंबरे, रमेश दाणे, भगवान शिंदे, निवृत्ती तायडे, विलास मोरे, श्रीमती आश्विनी गोसावी, चंद्रशेखर दवंगे, भिका बागूल, जनार्दन खेताडे, दिनकर लोहरे, विष्णू ढोले, सिध्दार्थ दिवे, भिमा पवार, बाळकृष्ण गायकवाड यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षक सुनील वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.