मनाच्या शांती व शुध्दीसाठी धार्मिक कार्यक्रम आवश्यक – उदागे महाराज

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० :  गोपाळ काल्यामुळे मनातील सर्व प्रकारचे विकार दूर होण्यास मदत मिळते. जीवनात परस्पर प्रेम, बंधुता, एकता, आदी सदगुणांची वृद्धी होते. काल्याचे किर्तन म्हणजे प्रसादाचे किर्तन. प्रसाद कोणालाही सहजासहज मिळत नाही. प्रयत्नाशिवाय काहीही शक्य नसल्याने जीवनात संत संगत अतिशय महत्वाची असते. असे प्रतिपादन हभप राम महाराज उदागे यांनी येथे केले.

        येथील खंडोबा मंदिराच्या प्रांगणात चंपाषष्ठीच्या निमित्ताने प्रतीवर्षीप्रमाणे  पार पडलेल्या अखंड हरीनाम सप्ताह, श्रीग्रंथराज   ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता, काल मंगळवारी हभप राम महाराज उदागे यांच्या  काल्याच्या कीर्तनाने झाली यावेळी ते बोलत होते.

        या वेळी उदागे महाराज पुढे म्हणाले, सध्या भौतिक सुखाची रेलचेल दिसत असली तरी मनुष्य मनशांती गमावून बसला आहे. मनाच्या शुद्धीसाठी अखंड हरीनाम सप्ताह, प्रवचन, कीर्तन, अत्यंत आवश्यक असून अशा विविध धार्मिक उपक्रमातून आजच्या पिढीला आदर्श जीवन जगण्याचे परिपूर्ण मार्गदर्शन मिळत असल्याने धार्मिक उपक्रमाला महत्व आहे.
    

या सप्ताह काळात विविध नामवंत प्रवचन व कोर्तनकारांची उपस्थिती लाभली. खंडोबा नगर भजनी मंडळ तथा सर्जेराव दहिफळे, शिवाजीराव भुसारी, श्रीमंत घुले,भारत पाडळे, बन्सीधर आगळे, नवनाथ भापकर, भिसे , सुनिल काकडे आदिंनी सप्ताह   यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. परिसरातील भाविकांची रोज मोठी उपस्थिती होती. सामाजिक कार्यकर्ते धर्मराज बटुळे, यांच्या महाप्रसादाच्या पंगतीने सोहळ्याची सांगता झाली.