कोपरगांव प्रतिनिधी, दि. १/९/२०२३ : ‘जीवनात आलेली संकटे अधोगतीकडे नव्हे तर प्रगतीकडे घेवुन जातात. मात्र सकारात्मक दृष्टीकोन असायला हवा. मी लहानपणातच दृष्टीहीन झालो. समाज आंधळा म्हणुन मला चिडवायचा, बाजुला बसवायचा. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्राची भुमिका आणि त्याच्याकडील मदत खुप महत्वाची असते.
मग माझ्यासाठी माझी आईच माझी मित्र बनली आणि तिने मला सांगीतले की, तु दुनियेला नाही पाहु शकत, परंतु असे करून दाखव की एक दिवस सर्व दुनिया तुझ्याकडे पाहील. हे प्रेरणादायी शब्द कानावर पडताच मी मागे कधीच वळून पाहीले नाही, यशस्वी होण्यासाठी परीश्रमाला पर्याय नाही, हा मंत्र आईने मला दिला.
मी यशस्वी होवुन इतरांच्या कामी आलो’, असे भावपुर्ण उद्गार तीन राष्ट्रपती व इतर शेकडो पुरस्कार प्राप्त, शुन्यातुन करोडांचा व्यवसाय करणारे, हजारो अंध व दिव्यांगांचे आधारस्तंभ, यशस्वी उद्योजक, स्फुर्तिदायक वक्ते, लेखक, क्रीडापटू, अशा अनेक बिरूदावली असणारे, डोळसांच्या डोळ्यात अंजन घालणारे डॉ. भावेश भाटीया यांनी काढले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एमबीए आणि पीजीडीएमला नव्यावे प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विध्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात डॉ. भाटीया प्रमुख व्याख्याते म्हणुन बोलत होते. या कार्यक्रमास रोटरी क्लब कोपरगांव सेंट्रलचे सहकार्य लाभले. सुमारे एक तासाच्या भाषणात स्वतःचे चांगले वाईट अनुभव कथन करत डॉ. भाटीया यांनी उपस्थितांच्या डोळ्यात कधी पाणी आणले तर कधी आपल्या बहारदार शैलीतून प्रेरणादायी शेरोशायरी करत उपस्थितांकडून टाळ्यांच्या गजरात दाद मिळविली. सदर प्रसंगी रोटरी क्लब कोपरगांव सेंट्रलचे अध्यक्ष राकेश काले, सचिव विशाल आढाव, माजी अध्यक्ष रोहित वाघ व विरेश अग्रवाल आणि संजीवनी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे डायरेक्टर डॉ. विनोद मालकर उपस्थित होते.
डॉ. भाटीया पुढे म्हणाले की, स्व. शंकरराव कोल्हे यांनी आपल्या ग्रामिण भागातील मुलं मुली शिकाव्यात म्हणुन अनेक शैक्षणिक दालने सुरू केली. त्यांचा वारसा अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे समर्थपणे पुढे चालवित आहे. स्व. कोल्हे यांचेकडे दूरदृष्टीता होती. याला अनुसरून ते म्हणाले की, प्रत्येकाचा जन्म दोन वेळेस होतो. पहिला आईच्या उदरातुन आणि दुसरा जेव्हा व्यक्तिची दूरदृष्टीता ठरते.
आपली यशोगाथा सांगताना ते म्हणाले की, माझी आई कर्क रोगाने आजारी पडली. माझ्यासाठी आई वडीलांनी जे काही कमविले होते, ते सर्व आईच्या उपचारासाठी विकुन झाले. वडील आणि मी रस्त्यावर आलो. १९९९ मध्ये मुबईतील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंडमध्ये प्रशिक्षणासाठी नाव नोंदवून एक परिवर्तनकारी पाऊल उचलले. तेथे मेणबत्या बनविण्याची कला आत्मसात केली आणि महाबळेश्वर येथे आपल्या मुळ गावी परतलो.
दररोज रात्री मेहनत करून हातगाडीवर मेणबत्ती विकायचे. त्यातुन मिळणाऱ्या उत्पन्नातुन १९९४ मध्ये ‘सनराइज कॅन्डल्स’ हा मेणबत्ती बनविण्याचा उद्योग सुरू केला. त्यात अंध व दिव्यांगाना प्रशिक्षण दिले. आज देशातील सुमारे १०००० पेक्षा अधिक अंध व दिव्यांग मेणबत्ती तयार करून महिण्याकाठी रू ६० हजार पर्यंत कमाई करीत आहेत. जे दुसऱ्याचा भार असतात असे अंध व दिव्यांग इतरांसाठी आधार बनले आहेत.
लेखनिकाच्या मदतीने त्यांनी अर्थशास्त्र व मानसशास्त्र या विषयांत एमए पुर्ण केले. परंतु त्यांचे हेल्थ कार्ड पाहील्यावर कोणीच नोकरी देत नव्हते. आज त्यांचे विविध प्रकारच्या मेणबत्या परदेशातही निर्यात होत आहे. हजारो अंध व दिव्यांगांना स्वावलंबी बनविले. याचीच दखल घेत तीन वेळा राष्ट्रपती पुरस्कारने सन्मानित केल.
आयुष्याची वाटचाल पुढे नेण्यात त्यांच्या पत्नी श्रीमती नीता यांची मोलाची साथ मिळाली, हे त्यांनी आवर्जुन सांगीतले. त्यांच्या पत्नी मुंबईमध्ये ८ पेट्रोल पंप मालकाच्या एकुलत्या वारस होत्या. परंतु त्यांनी माझ्यासारख्या अंध व्यक्तिशी लग्न करून मला आधार दिला. वेगवेगळे अनेक दाखले देत, आपल्या बहारदार शैलीतून उपस्थित विध्यार्थ्यांना ‘तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ जणु काही हा मंत्रच दिला. विध्यार्थी सुरज धनवटे याने सुत्रसंचालन केले तर डॉ. मालकर यांनी आभार मानले.