कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव मतदार संघातील गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून सिंचनासाठी आवर्तन द्या व कोपरगाव मतदार संघात दुष्काळ जाहीर करा अशी आग्रही मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे टंचाई आढावा बैठकीत केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे सोमवार (दि.२८) रोजी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीत आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील दुष्काळजन्य परिस्थिती मांडून विविध मागण्या केल्या आहेत.
आ. आशुतोष काळे यांनी पालक मंत्र्यांना मतदार संघाच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्या मांडताना दारणा समूहातून गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांनी ७ नंबर फॉर्म भरलेले आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांना तातडीने सिंचनासाठी आवर्तन द्यावे. कोपरगाव तालुक्यातील ६३ गावे रब्बी व १६ गावे ही खरीप हंगामात धरली जातात. परंतु तालुक्यातील सर्व ७९ गावांमध्ये खरिपाचे पीक वर्षानुवर्षे घेतले जात असून सर्वच ७९ गावांचा खरिपामध्ये समावेश करावा.
कोपरगाव तालुक्यातील सर्वच खरीप पिकांचे ५०% पेक्षा जास्त नुकसान झाले असून मतदार संघात २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड सर्वच महसूल मंडलात पडला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या निकषानुसार मतदार संघात दुष्काळाच्या उपाययोजना सुरु कराव्या. कोपरगाव तालुका पर्जन्यछायेखाली येत असून तालुक्यातील पर्जन्यमान नेहमीच कमी असते. त्यामुळे कमी पर्जन्यमान होवूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही.
आवर्तनाच्या ढिसाळ नियोजनाची आ. आशुतोष काळेंनी केली तक्रार गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याच्या आवर्तनाची जबाबदारी कार्यकारी अभियंता श्रीमती सहाने यांच्याकडे आहे. परंतु उजव्या-कालव्याच्या आवर्तनाचे नियोजन अतिशय ढिसाळ आहे. उजव्या कालव्यावर अजूनही पिण्याच्या पाण्याचेच आवर्तन सुरु आहे. आजपर्यंत पिण्याच्या पाण्याचे आवर्तन आटोपून सिंचनासाठी आवर्तन देणे गरजेचे होते. परंतु पाटबंधारे विभागाला हे नियोजन करता आले नाही अशी तक्रार करून पालकमंत्र्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली.
शासनाच्या विविध योजना व अनुदानाचा फायदा मिळत नाही त्यासाठी मतदार संघात स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी. कोपरगाव तालुक्यात २३ गावांमध्ये कृषी, जलनि:सारण, जि.प.ल.पा. ग्रामपंचायत, जलसंधारण, वनविभाग, सामाजिक वनीकरण आदी विभागांमार्फत सुरू असलेल्या कामांना गती द्यावी. मतदार संघात ज्या ठिकाणी नागरिकांची पाण्याच्या टँकरची मागणी आहेत.
त्यांना पाण्याच टँकर तातडीने उपलब्ध करुन द्या अशा विविध मागण्या आ. आशुतोष काळे यांनी टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे केल्या आहेत या मागण्यांना पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, आ. बबनराव पाचपुते, आ. राम शिंदे, आ. किरण लहामटे, आ. लहू कानडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आदी मान्यवरांसह शासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.