चाकूचा धाक दाखवत, बलात्काराची धमकी देत ललुटला लाखोचा ऐवज

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : तालुक्यातील चापडगाव जवळच्या वाल्हेकर वस्तीवर राहणाऱ्या शेतकरी कुटुंबास चाकूचा धाक दाखवत, बलात्काराची धमकी देत चोरट्याने सात शेळ्या, मोटर सायकल, मोबाईल, ३ बॅटऱ्या, गॅस शेगडी ४ -५ हजाराची रोख रक्कम व दोन महिलाच्या अंगावरील सोन्याचे दागिने असा लाखोचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लुटून नेला. ही घटना गुरुवारी दिनांक २१ च्यारात्री घडली. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात उशिरा पर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.

       सुभाष दाविद वाल्हेकर (वय ५५) पत्नी समिंद्रा, गणेश, कमलेश व निलेश ही तीन मुले व सून असे कुटूब आपापल्या खोल्यात झोपलेले असताना  रात्री साडेबाराच्या सुमारास एक चोरटा घराजवळ आल्याचे समिंद्रा वाल्हेकर यांनी पाहिला तेव्हा त्यांनी त्याला हाटकले. त्यावेळी चोरट्याने चाकूचा धाक दाखवून गप्प बसण्यास सांगितले. तोपर्यंत इतर चोरटे समोर आले. आरडाओरड झाल्याने सुभाष वाल्हेकर उठले. त्यांनाही चाकूचा धाक दाखवून चोरट्यानी गप्प बसवले.

त्यानंतर चोरट्यानी समिंद्रा यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने ओरबडून घेतले. काय न्यायचे ते न्या हाणमार करू नका म्हणून त्यांनी विनवणी केली. या गडबडीत घरातील हतर लोक उठले तेव्हा चोरट्यांनी सर्वांना गप्प करुन त्या सर्वाना एका खोलीत बंद करुन गणेशच्या पत्नीच्या गळ्यातील व कपटातील ४ ते ५ हजार रुपयेही घेतले.

दरम्यान  कमलेशने खोलीतून मोबाईल वर शेजार्यांना चोरीची कल्पना दिल्याने  शेजारील लोक येत  असल्याचे दिसताच चोरट्यानी दगडफेक करत पळ काढला. माहिती मिळताच पोलिस आले. श्वान पथक ठसे तज्ञ ही पाचारण करण्यात आले होते.